Sore Throat Remedies: खराब हवामानामुळे घशात सतत खवखव होते? करा प्रभावी घरगुती उपाय
Marathi January 30, 2026 05:25 AM

अनेकदा खराब हवामानामुळे घशात खवखव होते. कोरडी हवा, प्रदूषण किंवा थंड वाऱ्याचा हा परिणाम असतो. यामुळे अनेकदा अस्वस्थ होते. यावर औषधे घेण्यापेक्षा घरीच काही सोपे उपाय केल्यास आराम मिळतो. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यावर अशाप्रकारचे संसर्गाचे आजार होतात. त्यामुळे यावर घरगुती उपायच फायदेशीर ठरतात. ( Sore Throat Natural Remedies )

हलका आहार

हलका आहार घेतल्याने ते गिळायला सोपे जाते. यामुळे घशात त्रास होत नाही. घशात जर खवखव होत असेल तर तुम्ही खिचडी, उपीट, सूप असा हलका आहार घ्यावा. तसेच फ्रिजमधील पाणी, आईस्क्रीम किंवा थंड शीतपेये काही दिवस पूर्णपणे बंद करा. शक्य तितके कमी बोला जेणेकरून घशावर ताण पडणार नाही.

गुळण्या

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशाची खवखव कमी होते आणि खोकल्यापासून आराम मिळतो. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि दिवसातून कमीत कमी दोनदा गुळण्या करा. मीठ घशातील बॅक्टेरिया मारण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते.

मध आणि आले

आले हे अनेक आजारांवर प्रभावी ठरते. त्याचे दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म घशातील खवखव कमी करण्यास फायदेशीर ठरतात. आले किसून एक कप पाण्यात उकळा आणि हे पाणी गाळून त्यात मध घालून प्या. यामुळे घशाला आराम मिळतो.

वाफ

संसर्गाचे आजार झाल्यास वाफ घेणे फायद्याचे ठरते. यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. वाफ घेण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात काही थेंब निलगिरी तेल घाला. तुमचे डोके टॉवेलने झाका आणि ५-१० मिनिटे वाफ घ्या. यामुळे श्वासमार्ग मोकळा होतो.

हेही वाचा: Warm Water Benefits : वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी खरंच उपयोगी ठरतं का? जाणून घ्या सविस्तर

हळदीचे दूध

हळद ही नैसर्गिक ‘टी-बायोटिक आहे. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर हळद आणि थोडी काळी मिरी पूड टाकून प्या. यामुळे घसा दुखण्यापासून आराम मिळतो.

( Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.