सख्ख्या भावांमध्ये थेट राजकीय लढत
esakal January 30, 2026 03:45 PM

पनवेल, ता. २९ (बातमीदार) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असून, पनवेल तालुक्यातील नेरे जिल्हा परिषद गणा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत होत असून, विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात रिंगणात उतरले आहेत.

शेकापकडून मारुती बाळू भस्मा, तर भाजपकडून त्यांचे सख्खे भाऊ आत्माराम बाळू भस्मा जिल्हा परिषद सदस्यपदासाठी निवडणूक लढवत आहेत. सख्ख्या भावांमधील या थेट राजकीय लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पनवेल तालुक्यात विविध पक्षांनी २१ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये नेरे गण्यातील ही भावाभावांतील लढत सर्वाधिक चर्चेत आहे. शेकापचे उमेदवार मारुती भस्मा हे यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य तसेच पनवेल पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्यरत होते. अनुभवाच्या जोरावर ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र, या वेळी त्यांच्यासमोर त्यांचेच लहान भाऊ आत्माराम भस्मा यांचे आव्हान उभे राहिले आहे.

या भागात पारंपरिकदृष्ट्या शेकापचे वर्चस्व राहिले आहे, परंतु रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागात राजकीय समीकरणे बदलली असून, भाजपही तालुक्यात हळूहळू बळकट होताना दिसत आहे. त्यामुळे ही लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी न मिळाल्याने अर्ज माघार
आदिवासी आरक्षण असलेल्या या गणामधून भाजपकडून गणपत वारगडा उमेदवारीस इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पत्नी उषा वारगडा यांच्यासह अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, २७ जानेवारीला दोघांनीही आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नेरे गणामध्ये दोन सख्ख्या भावांमधील थेट लढत निश्चित झाली असून, ही निवडणूक राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.