सांगोल्यात आगामी मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
esakal January 30, 2026 03:45 PM

सांगोल्यातील मतदान केंद्राध्यक्षांचे प्रशिक्षण पूर्ण

सांगोला, ता. २९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (एक व दोन) यांचे पहिले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
२४ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल) व विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे हे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणासाठी एकूण १३८० अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी यांनी आदेश दिले होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व कायद्यानुसार पार पडावी, या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत व समाधान वाघमोडे यांनी मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्ही पॅट हाताळणी, मतदार ओळख पडताळणी, आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ३२ झोनल अधिकारी उपस्थित होते.
तसेच विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे १४ वर्गखोल्यांमध्ये १४ झोनल अधिकारी व मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हॅन्डसॉन मशिनचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास तलाठी व महसूल सेवक उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया, क्लासरूम प्रशिक्षण व हॅन्डसॉन प्रशिक्षण पूर्ण झाल्याने निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्वास सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सांगोला बाळूताई भागवत यांनी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.