गोविंदाशी अफेअरच्या चर्चांवर अखेर 56 वर्षीय अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली..
Tv9 Marathi February 01, 2026 10:45 PM

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिने गोविंदाच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्जसुद्धा दाखल केल्याचं म्हटलं गेलं होतं. एकेकाळी गोविंदाचं अभिनेत्री नीलम कोठारीशी अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. या चर्चांवर आता खुद्द नीलमने प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदा आणि माझ्यात असं काहीच नव्हतं, असं तिने स्पष्ट केलं आहे.

उषा काकडे प्रॉडक्शनशी बोलताना नीलमने गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांना स्पष्टपणे फेटाळलं आहे. ती म्हणाली, “अरे देवा, हे कोण म्हणालं? गोविंदाजी खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. परंतु हा जो प्रश्न आहे, त्यात काहीच तथ्य नाही. व्यक्ती म्हणून ते खूपच चांगले आहेत आणि आम्ही अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. परंतु हे सत्य नाही. मला माफ करा पण हे अजिबातच खरं नाही. आमच्यात असं काहीही नाही. माझ्या मते नव्वदच्या दशकातील लिंक-अप या सगळ्याचं मूळ आहे. त्यावेळी याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यांना जे वाटायचं, ते छापायचे. खरं सांगायचं तर त्याकाळी आम्ही प्रेसला खूप घाबरायचो. कारण त्यांच्या कलमाची ताकदच सर्वकाही होती. जर तुम्हा सोबत दोन-तीन चित्रपट केले, तरी तुमचं अफेअर आहे असं मानलं जायचं.”

दुसरीकडे गोविंदाने ‘स्टारडस्ट’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत नीलम कोठारीची प्रशंसा केली होती. तो म्हणाला होता, “आम्ही एक सोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि आमची नेहमी भेट व्हायची. जसजसं मी तिला ओळखू लागलो, तसतसं मी तिला पसंत करू लागलो होतो. ती एक अशी महिला होती, जिच्यावर कोणाचाही जीव जडला असता. माझंही मन तिच्यावर जडलं होतं.” या मुलाखतीत सुनीता अहुजाशी साखरपुडा मोडण्यामागचंही कारण त्याने सांगितलं होतं.

गोविंदा पुढे म्हणाला, “मी सुनीताला मला सोडून जायला सांगितलं होतं. मी तिच्याशी साखरपुडा मोडला होता. पण जर तिने पाच दिवसांनंतर फोन करून साखरपुड्याबद्दल माझी मनधरणी केली नसती तर मी कदाचित नीलमशी लग्न केलं असतं. मला तिच्याशी लग्न करायचं होतं. यात काहीही चुकीचं होतं असं मला वाटत नाही.”

नीलम कोठारीने इंग्लंडमधील बिझनेसमन ऋषी सेठियाशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने अभिनेता समीर सोनीशी दुसरं लग्न केलं. या दोघांनी एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तर दुसरीकडे गोविंदाने 1987 मध्ये सुनीता अहुजाशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.