प्रफुल्ल पटेल की सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ; नवीन अपडेट समोर
Tv9 Marathi February 01, 2026 10:45 PM

हाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबाबत आणि नेतृत्वाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. एकीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली आहे. पण दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पियूष गोयल यांनी पीटीआयला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक विधान केले होते. अजित पवार यांच्या पश्चात आता प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, असा दावा पियूष गोयल यांनी केला होता. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीचे नेतृत्व आता पवार कुटुंबाकडून प्रफुल पटेलांसारख्या दिल्लीतील अनुभवी नेत्याकडे जाणार आहे का? असा सवालही उपस्थित केला जात होता.

सुनेत्रा वहिनी एक दयाळू आणि सक्षम लोकप्रतिनिधी आहेत. बारामतीमधील जनतेची त्यांनी केलेली सेवा मी पाहिली आहे. त्या उपमुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करतील, याची मला खात्री आहे. आम्ही माझे मित्र अजित दादांना खूप मिस करू. ते एक महान प्रशासक, लोकांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके होते. त्यांच्या निधनाने निश्चितच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि सुनेत्रा वहिनी यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे होतं. आता प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. शरद पवार यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे, असे विधान पियुष गोयल यांनी केले होते.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

पियुष गोयल यांचे विधान वाऱ्यासारखे पसरताच प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः पुढे येत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी ट्वीटवर एक ट्वीट करत याबद्दलची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नियुक्तीबाबतच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही निर्णय हा लोकशाही पद्धतीने घेतला जातो. आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करूनच अध्यक्षपदाचा निर्णय होईल. पक्ष सध्या कठीण काळातून जात असून सामूहिक नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

पियूष गोयल यांनी मान्य केली चूक

प्रफुल्ल पटेल यांच्या स्पष्टीकरणानंतर पियूष गोयल यांनीही आपली चूक मान्य केली. एका वरिष्ठ पत्रकाराने मला ही माहिती दिली होती, ज्याची शहानिशा न करता मीभाष्य केले. माझ्याकडून चुकीची माहिती दिली गेली, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करत आहे, असे स्पष्टीकरण देत त्यांनी वादावर पडदा टाकला.

राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा तिढा अद्याप कायम

दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये भावनाप्रधान वातावरण आहे. पवार कुटुंबाकडेच पक्षाची धुरा राहावी, अशी भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्यातरी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद गेल्याने त्या पक्षाचा चेहरा असतील, हे स्पष्ट होत असले तरी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.