Grammy Awards 2026 : भारताशी संबंधित या दिग्गज व्यक्तीने पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार
Tv9 Marathi February 02, 2026 04:45 PM

तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी वयाच्या 90 व्या वर्षी पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. दलाई लामा यांच्या ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिट होलिनेस द दलाई लामा’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. 68 वा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. जगभरातील हा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. दलाई लामा यांच्यासोबत काम केलेले गायक आणि गीतकार रुफस वेनराइट यांनी दलाई लामांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुकच्या श्रेणीत ग्रॅमी होस्ट ट्रेवर नोआ, युएस सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश केतनजी ब्राऊन जॅक्सन आणि मिली व्हॅनिलीचे फॅब मोरवन यांना नामांकन मिळालं होतं. या सर्वांवर मात करत दलाई लामा यांनी ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावे केला आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जरी ते तिथे उपस्थित नसले तरी या विजयाबद्दल त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘या पुरस्काराकडे मी वैयक्तिक यशाच्या रुपात पाहत नाही. तर हा आपल्या सामायिक सार्वत्रिक जबाबदारीची मान्यता म्हणून पाहतो. अत्यंत कृतज्ञता आणि नम्रतेनं मी याचा स्वीकार करतो. मला खरोखरच विश्वास आहे की शांती, करुणा, पर्यावरणाची काळजी आणि मानवतेच्या एकतेची समज या गोष्टी सबंध मानवांच्या कल्यासाठी आवश्यक आहेत. या ग्रॅमी पुरस्कारामुळे हा संदेश अधिक व्यापकपणे पसरण्यास मदत होऊ शकते’, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

His Holiness the Dalai Lama Receives Grammy Recognition Highlighting Universal Responsibility and Compassion

Grammy Award Best Audiobook Narration – Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama.

I receive this recognition with gratitude and humility. I don’t see… pic.twitter.com/YhK5zlyhem

— Dalai Lama (@DalaiLama)

‘मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा’ हा 2025 मध्ये प्रदर्शित झालेला इंग्रजी भाषेतील अल्बम आहे. या अल्बममध्ये एकूण 10 गाणी आहेत. दलाई लामा, उत्साद अमजद अली खान, कबीर सहगल यांनी मिळून ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. लॉस एंजिलिसमध्ये पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील मनोरंजन विश्वातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. दलाई लामा हे जरी मनोरंजन विश्वाशी संबंधित नसले तरी मनोरंजन जगताशी संबंध नसलेल्या व्यक्तींना ग्रॅमी पुरस्कार मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी बराक ओबामा यांनी दोनदा ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावे केला होता. ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ आणि ‘द ऑडेसिटी ऑफ होप’ या दोन अल्बम्ससाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.