1500 कोटी बजेट अन् कमाई 6200 कोटी, सीनसाठी 500 एकरामध्ये लावली मक्का, चित्रपट ठरला मेगा ब्लॉकबस्टर
Tv9 Marathi February 02, 2026 11:45 PM

सध्या अनेक चित्रपट ग्रीन स्क्रीन, व्हीएफएक्स आणि स्टुडिओमध्ये बसूनच तयार केले जातात. तंत्रज्ञानाच्या मदतीने भव्य सीन उभे केले जातात पण त्यामध्ये वास्तवाचा स्पर्श अनेकदा कमी पडतो. मात्र, काही दिग्दर्शक असे असतात ज्यांच्यासाठी चित्रपट बनवणे म्हणजे केवळ काम नसून ती एक जिद्द, वेड आणि ध्यास असतो. अशाच दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे हॉलीवूडचा जगप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन.

क्रिस्टोफर नोलन यांची ओळख ही त्यांच्या चित्रपटांमधील प्रॅक्टिकल इफेक्ट्ससाठी आहे. ते सीजीआयचा कमीत कमी वापर करण्यावर भर देतात. त्यांच्या मते, पडद्यावर जे काही दिसते ते शक्य तितके वास्तवाच्या जवळचे असावे. हीच विचारसरणी त्यांच्या 2014 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट सायन्स-फिक्शन चित्रपट ‘इंटरस्टेलर’ मध्ये ठळकपणे पाहायला मिळते.

‘इंटरस्टेलर’मध्ये पृथ्वीवरील भीषण दुष्काळ, नष्ट होत चाललेल्या पिकांची आणि मानवाच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अभिनेता मॅथ्यू मॅककॉनहे साकारत असलेला कूपर हा आपल्या कुटुंबासोबत मक्क्याच्या शेतात राहतो. हा सीन अधिक वास्तवदर्शी वाटावा यासाठी नोलनने सीजीआयचा वापर करण्यास स्पष्ट नकार दिला.

या सीनसाठी नोलनने कॅनडातील अल्बर्टा प्रांतात, कॅलगरी शहराजवळ तब्बल 500 एकर जमीन भाड्याने घेतली आणि तिथे प्रत्यक्ष मक्क्याची लागवड केली. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी सुमारे 83 लाख रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी त्यांना ‘मॅन ऑफ स्टील’चे दिग्दर्शक झॅक स्नायडर यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. स्नायडर यांनी त्यांच्या चित्रपटासाठी 100 एकरांवर मक्का पिकवला होता, मात्र नोलन यांनी ही कल्पना आणखी मोठ्या स्तरावर नेली.

या 500 एकर मक्क्याच्या शेतात चित्रपटातील अनेक महत्त्वाचे सीन शूट करण्यात आले. जमिनीवरील दृश्यांसोबतच ड्रोनच्या मदतीने घेतलेले हवाई शॉट्सही पूर्णपणे खऱ्या शेतातच चित्रित करण्यात आले. त्यामुळे पडद्यावर दिसणारी माती, पिके आणि वातावरण अधिक जिवंत आणि प्रभावी वाटते.

शूटिंग पूर्ण झाल्यानंतर हा मक्का वाया गेला नाही, हे या कथेचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. प्रोडक्शन टीमने संपूर्ण मक्क्याची कापणी करून ती बाजारात विकली. मिळालेल्या माहितीनुसार, या मक्क्याच्या विक्रीतून तब्बल सुमारे 1.35 कोटी रुपये उत्पन्न मिळाले.

बॉक्स ऑफिसवरही ‘इंटरस्टेलर’ने मोठी कामगिरी केली. या चित्रपटाचे बजेट सुमारे 1500 कोटी रुपये होते. या चित्रपटाने जगभरात सुमारे 6200 कोटी रुपयांची कमाई केली. आजही ‘इंटरस्टेलर’ला सर्वकालीन सर्वोत्तम सायन्स-फिक्शन चित्रपटांपैकी एक मानले जाते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.