पवार कुटुंबियांचे एकनिष्ठ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांचं निधन, नाशिक जिल्ह्यात हळहळ
निलेश बुधावले, एबीपी माझा February 04, 2026 12:43 AM

Ravindra Nana Paga passed away : नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळं नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.  रविंद्र नाना पगार यांच्यावर उद्या बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता उत्राने, ता. बागलाण जि. नाशिक येथे अंत्यविधी होणार आहे.

संघटनात्मक कामकाजाचा सुमारे 40 वर्षांचा अनुभव 

 ॲड. रविंद्र नाना पगार  हे सन 2012 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेल्या ॲड. रविंद्र नाना पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून काम केले होते. संघटनात्मक कामकाजाचा सुमारे 40 वर्षांचा अनुभव असलेल्या ॲड. रविॅद्र पगार यांनी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस व NSUI या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपद देखील यशस्वी रित्या सांभाळले होते.

1999 मध्ये शरद पवारांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये प्रथ्म घेतला होता मेळावा

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच विविध जिल्ह्यांना निरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले होते. सन 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज्यात सर्वप्रथम ॲड. रवींद्रनाना पगार यांनी नाशिक येथील मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनाथ मेळावा घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. अजित पवार व ना.छगन भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ॲड. रविंद्रनाना पगार या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना एकसंघ ठेवली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शोक व्यक्त केला जात आहे.

एक कुशल संघटक,अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व गमावले : छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ सहकारी ॲड. रवींद्र पगार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पक्षाचे एक निष्ठावान व सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे व 'नाना' म्हणून प्रसिद्ध असलेले ॲड. पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून झटत आले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात, विविध निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजवली. आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी सदैव जनहितासाठी केला. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले. ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका घेतली, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक,अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. पगार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!

Ajit Pawar Death Plane Crash: पाच दिवसात वाड्या-वस्त्या विजेच्या दिव्यांनी उजळल्या; अजितदादांची संवेदनशीलता अन् कार्यतत्परतेची नाशिक जिल्ह्याला प्रचिती, नेमकं काय घडलं होतं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.