पक्ष अजित पवारांचा होता, पटेलांचा नाही, भाजपचा अजेंडा स्वत:वर थोपवून घेतला नाही; सुनील तटकरे-पटेलांचे एक पाय नव्हे दोन्ही पाय भाजपत, पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का? संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोमेश कोलगे February 04, 2026 01:13 PM

Sanjay Raut on Praful Patel: अजित पवारांनी भाजपचा अजेंडा स्वत:वर थोपवून घेतला नाही, पक्ष चालवत होते, अजित पवारांनी भाजपसोबत जाताना  आपले विचार खुंटीला टांगले नाहीत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रफुल पटेल यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. प्रत्येक गोष्ट मोदी फडणवीसांना सांगितलीच पाहिजे हा हट्ट कशासाठी? अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रहार केला. 

पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का?

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांनी भाजपसोबत जाताना आपले विचार खुंटीला टांगले नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी चालवत होते. त्यामुळे भाजपची परवानगी घेण्याचा विषय नाही. प्रत्येक गोष्ट मोदींना फडणवीसांना सांगितलीच पाहिजे हा हट्ट कशासाठी? दोन पक्षात चर्चा झाली असेल तर आम्हाला माहिती असेलच हा अनाठायी हट्ट कशासाठी? पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का? अजित पवारांचा पक्ष पवारांचा पक्ष होता, त्यामुळे पटेल यांनी चिडचिड करू नये. पटेल हे मोदी शाह यांचे भक्त आहेत, महाराष्ट्राला पटेल असंच करा असा हल्लाबोल राऊत यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पक्ष अमित शाह यांनी स्थापन केला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रायवेट लिमिटेड त्यांची शेअरहोल्डर आहे. 

कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही

दरम्यान, चंद्रपुरातील तिढ्यावरही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षासोबत जायचे  नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही असे उद्धव ठाकरेंचे संकेत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार करारावरूनही राऊत यांनी तोफ डागली. ते म्हणाले, आपलं काहीतरी उघडे पडेल या भीतीपोटी मोदींनी अमेरिकेच्या पायाशी आणून ठेवलं आहे. पीयूष गोयल खोटं बोलत आहेत. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आपलं परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण ट्रम्प ठरवत असून सार्वभौमत्व गहाण टाकलं असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.