Air Pollution & Mental Health: प्रदूषणामुळे डिप्रेशन-एंग्जायटीचा वाढतोय धोका! हवेतील PM2.5 चा मेंटल हेल्थशी थेट संबंध; तज्ज्ञांचा इशारा
esakal February 07, 2026 09:45 AM

हवेचं प्रदूषण आता फक्त श्वसनसंस्थेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचा थेट परिणाम आपल्या मनावरही होत असल्याचं एका नव्या अभ्यासातून समोर आलं आहे. हवेत असणारे अतिशय सूक्ष्म कण, म्हणजेच PM2.5, दीर्घकाळ श्वासातून शरीरात गेल्यास डिप्रेशन आणि एंग्जायटीसारख्या मानसिक समस्या वाढू शकतात.

IIT दिल्लीच्या संशोधकांनी AIIMS दिल्ली, NIMHANS आणि सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञांसोबत मिळून हा अभ्यास केला आहे. हा रिसर्च आंतरराष्ट्रीय जर्नल iScience मध्ये प्रकाशित झाला असून, देशातील 12 राज्यांमधील सुमारे 35 हजार प्रौढांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसामसह अनेक राज्यांचा समावेश होता.

अभ्यासात काय आढळलं?

संशोधनानुसार, ज्या लोकांचा दीर्घकाळ PM2.5 शी संपर्क राहिला आहे, त्यांच्यात डिप्रेशनचा धोका सुमारे 8 टक्क्यांनी जास्त, तर एंग्जायटीचा धोका जवळपास 2 टक्क्यांनी अधिक आढळला. हा अभ्यास 2015–16 च्या नॅशनल मेंटल हेल्थ सर्वेतील डॉक्टरांनी निदान केलेल्या रुग्णांवर आधारित आहे. हा अभ्यास कारण-परिणाम स्पष्ट करत नसला, तरी प्रदूषण आणि मानसिक आरोग्य यांच्यातील नातं अधोरेखित करतो.

Pregnancy & Air Pollution: प्रेग्नन्ट महिलांसाठी खराब हवा धोकादायक! डॉक्टर सांगतात आरोग्य जपण्याचे सोपे उपाय तज्ज्ञ काय सांगतात?

AIIMS मधील कम्युनिटी मेडिसिन विभागातील डॉ. आनंद कृष्णा यांच्या मते, टक्केवारीने फरक कमी वाटू शकतो, पण जेव्हा मोठी लोकसंख्या सतत प्रदूषित हवेत राहत असते, तेव्हा याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. शहरांमध्ये राहणारे लोक, 40 ते 49 वयोगटातील व्यक्ती आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये हा धोका जास्त दिसून आला आहे.

प्रदेशानुसारही फरक जाणवला. पूर्व भारतात प्रदूषणामुळे डिप्रेशनचे प्रमाण जास्त दिसले, तर पश्चिम भारतात एंग्जायटीशी त्याचा संबंध अधिक आढळला.

नेमकं कोणतं प्रदूषण घातक?

या अभ्यासात फक्त PM2.5 चं प्रमाण नाही, तर त्यामधील वेगवेगळ्या रासायनिक घटकांचाही अभ्यास करण्यात आला. वाहनांची गर्दी, उद्योगधंदे आणि शेतीतून तयार होणारे सल्फेट, नायट्रेट आणि अमोनियम हे घटक डिप्रेशनशी अधिक संबंधित असल्याचं दिसून आलं. तर डिझेल आणि इंधन जळताना तयार होणारा एलिमेंटल कार्बन एंग्जायटीशी जास्त जोडलेला आहे.

संशोधकांच्या मते, हे घटक ओळखल्यामुळे नेमक्या कोणत्या प्रदूषण स्रोतांवर आधी नियंत्रण आणायला हवं, हे ठरवणं सोपं होईल.

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय! हे का आहे महत्त्वाचं?

आज देशातील अनेक भागांत हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. स्वच्छ हवा ही केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक शांततेसाठीही तितकीच महत्त्वाची आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.