निरगुडसर, ता. ९ : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी-पारगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तीनही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी तयार करून मोठी ताकद तयार केली होती तरी देखील ही सर्व ताकद विवेक वळसे पाटील यांचा विजय रोखू शकली नाही. यामध्ये विवेक वळसे पाटील यांचा २८०७ मतांनी विजय झाला. सलग दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील यांनी अरुण गिरे यांचा पराभव केला आहे.
या गटात दोन माजी उपाध्यक्ष सलग दुसऱ्यांदा समोरासमोर निवडणुकीसाठी उभे होते तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात होते तर समोर शिवसेनेचे अरुण गिरे हे होते. या निवडणुकीत विवेक वळसे पाटील यांचा पराभव करण्यासाठी पारगाव कारखाना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेऊन देखील या सभेचे रूपांतर मतात होऊ शकले नाही.
पराभवाचा वचपा नणंदबाईने काढली भरून
कळंब-चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तुलसी सचिन भोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून प्रीती प्रवीण थोरात या नणंद भावजय यांची लढत सलग दुसऱ्यांदा पाहायला मिळाली,यामध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकीत तुलसी भोर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर प्रीती थोरात या शिवसेना पक्षाकडून लढल्या होत्या त्यावेळी नणंद प्रीती थोरात यांचा १ हजार ८ मतांनी भावजय तुलसी भोर यांनी पराभव केला होता,त्यानंतर या निवडणुकीत पुन्हा एकदा नणंद भावजय निवडणूक रिंगणात समोरासमोर आल्या,यावेळी मात्र मागचा पराभवाचा वचपा नणंदबाईने भरून काढला आणि या निवडणुकीत नणंदबाई प्रीती थोरात यांनी भावजय तुलसी भोर यांचा १५६१ मतांनी पराभव केला ही लढत चांगलीच अटीतटीची झाली.