थकबाकी वसुलीचे आव्हान
esakal February 10, 2026 08:45 AM

थकबाकी वसुलीचे आव्हान
वसई-विरार महापालिकेसमोर मालमत्ता कराचा डोंगर
विरार, ता. ९ (बातमीदार) : आर्थिक वर्ष संपायला अवघे दीड महिने शिल्लक असताना वसई-विरार महापालिका प्रशासनासमोर मालमत्ता करवसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या १० महिन्यांत पालिकेला केवळ २९५ कोटी २८ लाख रुपयांचीच वसुली करता आली असून, ही एकूण मागणीच्या अवघ्या ३४ टक्के इतकी आहे. ३१ मार्चपर्यंत तब्बल ५७२ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे कठीण ‘टार्गेट’ आता प्रशासनासमोर आहे.
मालमत्ता करवसुली अपुरी राहिल्याने पालिकेच्या तिजोरीत पैशांचा ठणठणाट निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा योजना, दिवाबत्ती, स्वच्छता, विकासकामांची देयके तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेही कठीण बनले आहे. गेल्या वर्षी पालिकेने मार्च अखेरपर्यंत ४०० कोटी रुपयांची वसुली करत उच्चांक गाठला होता. मात्र, यंदा एकूण मागणी ८६८ कोटी १३ लाख इतकी असतानाही अपेक्षित गती वसुलीला मिळालेली नाही.
निवडणूक प्रक्रियेमुळे कर्मचारी यंत्रणा व्यस्त राहिली. अधिकाऱ्यांच्या बदल्या, नगररचना घोटाळा, इमारत दुर्घटना अशा घटनांमुळेही वसुली मोहिमा मागे पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये शास्तीमाफी आणि निवडणूक उमेदवारांकडून करभरणा झाल्याने एकाच महिन्यात ४२ कोटींची वसुली झाली, मात्र तरीही ३०० कोटींचा टप्पा फेब्रुवारीअखेर पार होऊ शकलेला नाही.

विकास निधीचा प्रश्न
मालमत्ता कर हा महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. विकास शुल्क, पाणीपट्टी, बाजार कर व जाहिरात कर यांतून मिळणारा निधी मर्यादित असल्याने संपूर्ण भार मालमत्ताकरावर आहे. यंदा विकासकामांच्या मंजुरी कमी झाल्याने विकास शुल्कातून येणारा निधीही घटला आहे. परिणामी शहरातील मोठ्या प्रकल्पांची देणी भागवणे कठीण झाले असून, गरज भासल्यास पालिकेच्या एफडी तोडण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा आहे. आगामी ५२ दिवसांत आक्रमक वसुली मोहीम राबवली नाही, तर पालिकेची आर्थिक स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
========================================================
प्रभागनिहाय मालमत्ता करवसुली व थकबाकी (रुपयांत)
प्रभाग करवसुली थकबाकी
ए ३२ कोटी ७४ लाख २८ कोटी २३ लाख
बी ३२ कोटी ९१ लाख ६५ कोटी २२ लाख
सी १९ कोटी ६६ लाख ३५ कोटी ३१ लाख
डी १७ कोटी ३२ लाख २९ कोटी ९२ लाख
ई २३ कोटी ५९ लाख ४३ कोटी १० लाख
एफ ४६ कोटी १६ लाख १४९ कोटी ३३ लाख
जी ९४ कोटी ५३ लाख १९९ कोटी ५२ लाख
एच १६ कोटी ८२ लाख ९ कोटी ९७ लाख
आय ११ कोटी ५५ लाख १२ कोटी २१ लाख
एकूण २९५ कोटी २८ लाख ५७२ कोटी ८५ लाख

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.