“नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या!” हा प्रसादचा प्रेमळ आवाज ऐकला की डोळ्यांसमोर येतं दीपिकाचं रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं ताट आणि कॅमेऱ्यामागून येणारी त्यांची हसतमुख कमेंट्री.
गेल्या १० वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांना हसवणारी, खवय्यांना भुरळ पाडणारी ही प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक यांची जोडी अचानक डिजिटल संकटात सापडली आहे. त्यांचे इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब आणि एक्स (ट्विटर) वरील सर्व प्रमुख व्हेरिफाइड अकाउंट्स कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सस्पेंड करण्यात आले आहेत.
हे सगळं सुरू झालं २०१४ मध्ये ‘Ur Indian Consumer’ (UIC) या चॅनेलपासून. भारतात व्ह्लॉगिंगची लाट येण्याआधीच या जोडीने आपल्या दैनंदिन जीवनातील मजेदार क्षण, घरगुती जेवण आणि छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करायला सुरुवात केली.
टिकटॉकवर तर त्यांनी फक्त ६ महिन्यांत १० लाख फॉलोअर्स कमावले आणि इतिहास रचला. पण खरी कमाल झाली ‘लंच विथ प्रसिका’ या सिरीजने. साधं घरगुती जेवणाचं ताट इतकं व्हायरल होऊ शकतं, हे त्यांनी दाखवून दिलं.
एकदा दीपिकाने खिडकीत बसून जेवताना तिच्या ताटातली हिरवी पोळी पाहून लोक अवाक झाले. नंतर बीटची लाल पोळी, इतर रंगीबेरंगी पोळ्या… आणि बघता बघता ही जोडी “रंगीबेरंगी पोळ्या बनवणारे कपल” म्हणून ओळखली जाऊ लागली.
त्यांची क्रिएटिव्हिटी इतकी जबरदस्त होती की, ‘Upstox’ सारख्या मोठ्या ब्रँड्सनी त्यांना आयपीएल मॅचसाठी खास आमंत्रित केलं होतं, जिथे त्यांच्या व्हिडीओंनी 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले.
शाळा-कॉलेज-ऑफिससाठी ‘लंचबॉक्स विथ प्रसिका’, नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी नऊ रंगांच्या खास थाळ्या… अशा अनेक हटके आयडिया त्यांनी राबवल्या आणि प्रेक्षक नेहमीच त्यांच्यात गुंतले राहिले.
मेटा (इन्स्टाग्राम आणि फेसबुक) कडून ‘कम्युनिटी गाइडलाइन्स’ उल्लंघनाचा दावा करून अकाउंट्स सस्पेंड केले गेले, पण नेमकं कोणतं उल्लंघन झालं किंवा कोणत्या हँडलमुळे हे झालं, याची कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. प्रसाद म्हणाला की, १० वर्षांची मेहनत एका रात्रीत हिरावली गेली आहे आणि हे त्यांच्या टीमच्या कमाईवरही परिणाम करणार आहे. तरीही ते हताश नाहीत. ते तांत्रिक आणि कायदेशीर मार्गाने अकाउंट्स परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कठीण काळात त्यांचे हजारो चाहते सोशल मीडियावर त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि मेटाला आवाहन करत आहेत.