Mumbai Mahalaxmi Racecourse: महायुती सरकारने महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची जागा एकत्रित करून सुमारे 300 एकरचे 'सेंट्रल पार्क' विकसित करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा, पारंपारिक भारतीय खेळ आणि 5 हजार वाहनांसाठी भूमिगत पार्किंग व्यवस्थेचा समावेश आहे. हा प्रकल्प 'पार्क अपग्रेड' म्हणून सादर केला जात असला तरी, तो प्रत्यक्षात एक मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. 'मुंबई आर्किटेक्ट्स कलेक्टिव्ह' अंतर्गत 102 वास्तुविशारद (architects), डिझाइनर आणि नियोजकांनी या पुनर्विकासाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहून इशारा दिला आहे की, कोणत्याही प्रकारच्या भूमिगत बांधकामामुळे शहराच्या या शेवटच्या मोठ्या मोकळ्या जागेचे कायमचे नुकसान होऊ शकते. रेसकोर्सची जागा सध्या सार्वजनिक असून नागरिक तेथे फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी वापर करत आहेत.
रेसकोर्सची जमीन नैसर्गिक सच्छिद्र पृष्ठभाग (natural surface) असून ती पावसाचे पाणी शोषण्यासाठी, भूजल पुनर्भरण करण्यासाठी आणि पुराचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भूमिगत काँक्रीट बांधकामामुळे त्यावरील पृष्ठभाग केवळ 'काँक्रीट स्लॅब' राहील, जिथे झाडे वाढू शकणार नाहीत आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट होईल. अशा ठिकाणी केवळ 'प्लास्टिकचे गवत' उरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावरील बांधकामामुळे धुळीचे प्रमाण वाढून शहरात प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होऊ शकते. भूमिगत पार्किंग आणि क्रीडा संकुले बांधणे व त्यांची देखभाल करणे (व्हेंटिलेशन, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा) अत्यंत खर्चिक आहे. तज्ञांच्या मते, हा पैसा शहरातील इतर पालिका उद्यानांच्या सुधारणेसाठी वापरला जाऊ शकतो. प्रस्तावित भूमिगत पादचारी बोगद्यांमुळे 'ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट' (TOD) नियमांनुसार आसपासच्या मालमत्तांचा एफएसआय (FSI) वाढू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पार्क सुधारण्यासाठी नसून रिअल इस्टेटच्या फायद्यासाठी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आर्किटेक्ट्सच्या मते, एकदा काँक्रीटची संरचना उभारली गेल्यानंतर सार्वजनिक मैदानाचे नैसर्गिक स्वरूप कायमस्वरूपी बदलण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. शहरातील मोजक्या मोठ्या खुल्या जागांपैकी एक असलेल्या रेसकोर्सचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन हा प्रकल्प थांबवावा, अशी त्यांची भूमिका आहे.
इतर महत्वाच्या बातम्या