लोगो : सांगोला नगरपालिका
---
SGW26B09321
स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर प्रभाग करणार
सांगोला : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षम आणि दर्जेदार पद्धतीने मिळाव्यात, हा माझा प्रमुख ध्यास आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या रस्ते, पाणी, वीज आणि स्वच्छतेच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्या प्रभागात चांगल्या दर्जाचे व टिकाऊ रस्ते उभारणे, उच्च दाबाने व नियमित स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, भुयारी गटार व्यवस्था सक्षम करणे यावर विशेष भर दिला जाईल. तसेच एलईडी पथदिव्यांद्वारे प्रकाशव्यवस्था सुधारून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येईल. प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवून स्वच्छ आणि निरोगी परिसर घडविण्यास प्राधान्य दिले जाईल. प्रभाग क्रमांक दहाचाच नव्हे तर संपूर्ण सांगोला शहरातील सर्व प्रभागांमध्ये समान विकास व्हावा, यासाठी शहराच्या एकूण निधीच्या योग्य नियोजनावर लक्ष ठेवले जाईल. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत गरजांसाठी उपलब्ध निधीचा पारदर्शक आणि कार्यक्षम वापर करण्यावर माझा भर राहील. ‘स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर प्रभाग’ ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात उतरवण्याचा माझा संकल्प आहे. नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य याच्या बळावर आपण एक आदर्श प्रभाग उभारू, असा मला विश्वास आहे.
- विवेक पाटील, नगरसेवक, सांगोला नगरपालिका
---
PNE26V97374
चांडोलवाडी पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्नशील
सांगोला : शहरातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये विविध वस्त्यांचा समावेश असल्यामुळे येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर दिला जाणार. प्रभागातील चांडोलवाडी येथे पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर असून, नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहणार आहे. तसेच सध्या प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करून दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे पहिले प्राधान्य राहील. बनकर वस्ती, तळ्यातील राऊत मळा तसेच एखतपूर रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्याचा मानस आहे. यासाठी आवश्यक शासकीय पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सीमा सरगर, नगरसेविका, सांगोला