CM Devendra Fadnavis : 'एआय' शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे; गुंतवणुकीसाठी सहकार्याचे सूतोवाच
esakal February 21, 2026 12:45 PM

नवी दिल्ली - ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केवळ प्रदर्शनांपुरता न राहता तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी  भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था व गुंतवणूकदारांशी सहकार्य  करण्यास महाराष्ट्र तयार आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेत केले. ‘कृषिक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता.

‘भारत मंडपम’ येथे आयोजित या सत्रात मुख्य सचिव राजेशकुमार अगरवाल, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी, कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन’च्या अध्यक्ष डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष जोहॅन्स झुट, ‘एकस्टेप फाउंडेशन’चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मरुवाडाही यात सहभागी झाले होते. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मंत्री नीतेश राणे देखील यावेळी हजर होते.

संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी

या सत्रात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘‘कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अन्न सुरक्षितता, हवामान बदलाचा सामना करण्याची क्षमता, महिला सक्षमीकरण व सर्वांगीण समृद्धी साधण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे.

जागतिक पातळीवर अन्न सुरक्षिततेवरील ताण, हवामानातील तीव्र बदल, भूजलाची घटणारी पातळी, मृदा आरोग्याचा ऱ्हास, पुरवठा साखळ्यांची नाजुकता व बाजारातील अनिश्चितता अशी आव्हाने उभी ठाकली आहेत. दक्षिणेकडील जगात कृषी केवळ अर्थकारणाशी संबंधित नसून उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे.

भारतातील निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ‘कृषी’वर अवलंबून आहे. पण हवामान, उत्पादन खर्च, बाजारभाव, वित्तपुरवठा यांची माहिती मर्यादित आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे  वेळीच व अचूक माहिती  देऊन सध्याच्या व्यवस्थेतील मर्यादा दूर करता येऊ शकतात.’

शेतीशी निगडीत विविध सेवा आपण विश्वासाशिवाय देऊ शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरता मर्यादित न राहता लाखो लोकांपर्यंत पोहोचायला हवे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. ‘महाराष्ट्र शासनाने त्यासाठी ‘महाॲग्री’ एआय धोरण स्वीकारले आहे. हे धोरण सर्वांसाठी खुले आणि परस्पर समन्वय साधणारे आहे.

या धोरणावर आधारित विकसित केलेला मोबाइल प्लॅटफॉर्म विविध भाषांत वैयक्तिक सल्ला देतो, बाजारपेठेतील घडामोडींची माहिती, हवामान बदलाबाबत सूचना आणि अनेक शासकीय योजनांबाबत सल्ला देण्याचे काम तो करतो,’’ अशी माहिती त्यांनी दिली.

ही जादूची कांडी नाही

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बॅकवर्ड–फॉरवर्ड लिंकेज, हवामान, सिंचन, खतपुरवठा, बाजारभाव व पुरवठा साखळीबाबत माहिती मिळू शकते, असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘इंडिया एआय मिशन’मध्ये कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, सेवापुरवठा, समावेशकता यांचा विचार केला गेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता जादूची कांडी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. एआय मॉडेल हे विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकदायित्व यावर आधारित हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या उपक्रमांचे परिसंवादात कौतुक

महाराष्ट्राचे एआय क्षेत्रातील योगदान आणि तंत्रज्ञान वापराबाबत देवेश चतुर्वेदी यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या क्षेत्रासाठीचा पुढाकार आणि विशेषतः कृषी विभागाने राबविलेल्या ‘फार्मर आयडी’ आणि ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’सारख्या उपक्रमावर त्यांनी स्तुतिसुमने उधळली.

डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सजगता यावी यावर भर दिला. ‘तंत्रज्ञानाच्या अंगाने, कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांमध्ये स्त्रियांचे स्थान महत्त्वाचे आहे याचा विसर पडता कामा नये,’ याचा उल्लेख करून स्वामिनाथन म्हणाल्या की, ‘तंत्रज्ञान हे चांगले किंवा वाईट नसते. ते कसे वापरले जाते, यावर त्याचे यश अवलंबून असते.’ कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

शेतकऱ्यांकडून ‘एआय बॉट’चा वापर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सर्वच क्षेत्रात ‘एआय सज्ज’ असे आपले राज्य असेल. शेतीतील उत्पादन खर्च कसा कमी करता येईल?, कीडनाशक फवारणी कशी करावी? बाजाराशी संपर्क कसा असावा? या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळत आहेत. केंद्राची अॅग्रिस्टॅक योजना ‘महाविस्तार’शी जोडल्यानंतर महाराष्ट्रातील २५ लाख शेतकरी एआय बॉटचा वापर करत आहेत. हवामान अनुकूल शेतीच्या दिशेने आम्ही जात आहोत.’

दिवसभरात

  • दिल्ली उद्घोषणेवर तब्बल

  • ७० देशांची स्वाक्षरी

  • ‘मायक्रोसॉफ्ट’चे अध्यक्ष स्मिथ यांची शाळांना भेट

  • ‘स्टार्टअप’च्या ‘सीईओं’शी पंतप्रधान मोदींचा संवाद, काही उद्योगपतींबरोबरही चर्चा

  • भारताच्या प्रगतीचे नाणेनिधींच्या ‘एमडीं’कडून कौतुक

  • युवक काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपची टीका

  • एआय-सक्षम बायोमेट्रिक प्रणालीमुळे  आता डुप्लिकेट नोंदीही ओळखता येणार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.