‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर दीपिकावर सर्जरी झाली आणि ती पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगू लागली. परंतु आता दीपिकाला आरोग्याची दुसरी एक समस्या जाणवू लागली आहे. तिला पोटात अचानक इतक्या तीव्र वेदना वेदना जाणवू लागल्या, की तातडीने रुग्णालयात तपासणीसाठी जावं लागलं. याविषयी अपडेट खुद्द दीपिकानेच व्लॉगद्वारे चाहत्यांना दिली आहे.
दीपिकाच्या पोटात गाठ (सिस्ट) झाली असून त्यावर प्रोसिजर करणं महत्त्वाचं असल्याचं, डॉक्टरांनी म्हटलंय. शोएब आणि दीपिकाने रुग्णालयातूनच हा नवीन व्लॉग पोस्ट केला आहे. यामध्ये शोएबने सांगितलं की दोन दिवसांपासून दीपिकाच्या पोटात खूप दुखत होतं. काल वेदना अधिक तीव्र झाल्यानंतर तिला डॉक्टरांकडे आणलं. सिटी स्कॅनमध्ये समजलं की दीपिकाच्या पोटात सिस्ट झाले आहेत. या सिस्टची साइज 1.3 सेंटिमीटर आहे. दीपिकाने सांगितलं की पोटासोबतच तिचा खांदासुद्धा दुखत होता, त्यामुळे ती चिंचेत होती. सिस्टशिवाय इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं तिने स्पष्ट केलं. डिसेंबरमध्ये जेव्हा दीपिकाचा PET स्कॅन करण्यात आला, तेव्हासुद्धा रिपोर्ट्स नॉर्मलच होते.
View this post on Instagram
A post shared by Dipika (@ms.dipika)
“दीपिकाला लिव्हर कॅन्सर झाल्यापासून एकच भीती असते की तिला पुन्हा कॅन्सर होऊ नये. डॉक्टरांनी पोटातील सिस्टवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणतीही मोठी शस्त्रक्रिया होणार नाही. छोट्याच्या प्रोसिजरने ते सिस्ट बर्न केले जातील. त्यासाठी दीपिकाला तीन ते चार दिवसांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. काल आम्ही व्लॉगमध्ये हसत होतो आणि आज आम्ही पुन्हा रुग्णालयात आहोत. हेच आयुष्य आहे. परंतु आम्ही अल्लाहचे आभार मानतो की सुरुवातीच्या स्टेजमध्येच आम्हाला सिस्टबद्दल समजलं”, अशा शब्दांत शोएब व्यक्त झाला. यावेळी दीपिकासुद्धा खूप भावूक झाली होती. यावेळी तिने चाहत्यांनाही छोट्यातल्या छोट्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला दिला आहे. तिने चाहत्यांकडे तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. या व्लॉगवर अनेकांनी कमेंट्स करत तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी धीर दिला.