Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! १४ हजार लिटर पेट्रोल डिझेलचा ट्रक उलटला अन्...
Saam TV February 22, 2026 09:45 PM
  • कोलेटीजवळ इंधन टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने शेतात घुसला

  • टँकरमध्ये १४ हजार लिटर ज्वलनशील इंधन असल्याने भीतीचे वातावरण

  • पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी तैनात; सुरक्षा बंदोबस्त वाढवला

  • संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवारी सकाळी टँकर बाहेर काढण्याचे नियोजन

अमित गवळे, रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर काल म्हणजेच शनिवारी सायंकाळी एका भीषण अपघात झाला. कोलेटी गावाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला असून, हा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन अडकला आहे. या टँकरमध्ये तब्बल ९,००० लिटर पेट्रोल आणि ५,००० लिटर डिझेल असा एकूण १४,००० लिटर ज्वलनशील साठा असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा टँकर मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट महामार्गालगतच्या शेतात घुसला. सुदैवाने, या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी, इंधनाचे प्रमाण प्रचंड असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम

घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस प्रशासनाने परिसराची नाकाबंदी करून वाहतूक सुरळीत केली. अग्निशमन दल हे संभाव्य आग किंवा गळती रोखण्यासाठी घटनास्थळी तैनात आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षनार्थ सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक आणि इतर संबंधित यंत्रणा मदतीसाठी धावून आले आहेत. संपूर्ण परिसराची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

Sambhajinagar Crime : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं, आईनेच काढला लेकीचा काटा; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने रात्रीच्या वेळी टँकर बाहेर काढणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून उद्या रविवारी सकाळी हा टँकर सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे नियोजन केले आहे. तोपर्यंत परिसरावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. "नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.