Marathi Bhasha Gaurav Din 2026 : मराठीच्या गौरवास्पद ग्रंथसंपदेतील मौलिक रत्ने
esakal February 22, 2026 09:45 PM

आनंद हर्डीकर - anand47.hardikar@gmail.com

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा दुसरा ‘मराठी भाषा गौरव दिन’ येत्या २७ फेब्रुवारीला (शुक्रवार) साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने मराठीच्या इतिहासाबद्दलच्या दोन जुन्या ग्रंथांवर पुन्हा टाकलेला हा प्रकाशझोत!

‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने मराठीच्या इतिहासाबद्दलच्या दोन जुन्या ग्रंथांवर पुन्हा प्रकाशझोत टाकणं आवश्यक वाटतं.

पहिला ग्रंथ आहे १९६० मध्ये डॉ. श्री.म. पिंगे यांनी स्वतःच प्रकाशित केलेला प्रबंध - ‘युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या व मराठी संशोधन मंडळाच्या वतीने पुरस्कृत केल्या गेलेल्या ग्रंथमालेतला हा ग्रंथ म्हणजे डॉ. पिंगे यांनी पीएच.डी. पदवीसाठी लिहिलेला प्रबंधच आहे. तोपर्यंत मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये काही मोजक्या युरोपीयनांच्या ग्रंथाचा उल्लेख होत असे, पण या प्रबंधात बहुतेक सर्व युरोपीयन लेखकांच्या ग्रंथांविषयी आणि त्यांनी ते ते ग्रंथ कोणकोणत्या परिस्थितीत लिहिले, त्याबद्दलही ऐतिहासिक माहिती संकलित स्वरूपात अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रबंध लिहिताना डॉ. पिंगे यांनी सर जदुनाथ सरकार आणि रियासतकार गो.स. सरदेसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ इतिहासकारांकडून पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवले होते आणि अपरिहार्यपणे कराव्या लागलेल्या पोर्तुगीज जेसुइट मिशनऱ्यांच्या साहित्याच्या अभ्यासात पोर्तुगीज भाषातज्ज्ञ व मराठी संशोधन मंडळाचे ख्यातनाम संचालक प्रा. अनंत काकबा प्रियोळकर यांचे भरीव सहकार्यही मिळवले होते.

४३२ पानांच्या या ग्रंथामधील एकूण १८ प्रकरणांमध्ये मिळून अक्षरशः शेकडो पुस्तकांबद्दलची जास्तीत जास्त माहिती तर वाचायला मिळतेच, पण त्या त्या पुस्तकाची उपलब्धता, आवृत्त्यांची संख्या आणि पृष्ठसंख्येवर अवलंबून असणारे किमतीतले फेरबदल वगैरे रंजक तपशीलही समजतात. डॉ. पिंगे यांनी या ग्रंथामध्ये युरोपियन अभ्यासकांची, मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांनी केलेल्या चिकाटीच्या प्रयत्नांची आणि मराठीवर प्रभुत्व मिळवल्यावर केलेल्या तिच्या सेवेची माहिती अशा मोजक्या उदाहरणांसह सादर केली आहे की, एकाच वेळी त्या अभ्यासकांबद्दलचा आदरभाव मनात निर्माण होतो आणि परकीयांनासुद्धा आकर्षित करू शकणाऱ्या आपल्या मातृभाषेबद्दलची आपली अनास्थाही जाणवू लागते.

प्रसिद्ध पाली पंडित धर्मानंद कोसंबी यांना ज्याचे मराठी क्रिस्तपुराण वाचल्यावर तो ग्रंथ एखाद्या विदेशी माणसाने नव्हे, तर कोणातरी बाटग्यानेच रचला असावा, अशी प्रामाणिक शंका व्यक्त करावीशी वाटली, तो फादर स्टीफन्स आणि त्याची प्रासादिक मराठी... ज्या स्थानिक भाषापंडितांकडून मराठीचे धडे गिरवले, त्यांच्याच लेखातील चुका दाखवण्यापर्यंत मजल मारणारा आणि ‘महाराष्ट्रभाषागुरू’ या उपाधीला सर्वार्थाने पात्र ठरलेला मेजर थॉमस कँडी... व्यवसायाने लष्करी अभियंता असतानाही अर्वाचीन मराठीत गणितविषयक ग्रंथांची भर घालणारा कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस... या आणि अशाच अन्य तीस-पस्तीस अभ्यासकांची डॉ. पिंगे यांनी या रेखाटलेली व्यक्तिचित्रे अत्यंत प्रभावी आहेत.

Sambhajinagar Book Festival : मराठी संस्कृतीत ग्रंथ-ग्रंथकारांची थोर परंपरा

अशा व्यक्तिचित्रांच्या बरोबरीनेच वेगवेगळ्या मिशनरी यंत्रणांनी मराठीबाबत जी मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. तिचाही विस्तृत आढावा या ग्रंथात डॉ. पिंगे यांनी घेतला आहे. डॉ. विल्यम कॅरेचे श्रीरामपूर मिशन, अहमदनगर येथील अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन वगैरेंनी मराठीची केलेली विविधांगी सेवा, मराठीच्या व्याकरणापासून कोशांपर्यंत विविध वाड्मयप्रकारांत घातलेली मोलाची भर इ. बाबतींतही हा ग्रंथ म्हणजे माहितीचा समृद्ध खजिनाच आहे. (ग्रंथाची किचकट मुद्रणप्रक्रिया साधना प्रेसच्या चिं.ग. वझे यांनी पार पाडली होती, तर वितरक होते व्हीनस प्रकाशन. किंमत होती ‘पंचाहत्तर रुपये फक्त’!)

दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे, ‘मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल’ हा जुन्या पिढीतले साक्षेपी, व्यासंगी लेखक शं. गो. तुळपुळे यांनी लिहिलेला आणि ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’ने आपल्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित केलेला ग्रंथ. तुलनेने तो लहान आहे (२२४ पानी), परंतु संदर्भसमृद्धीच्या दृष्टीने तेवढाच महत्त्वाचा आहे. मुद्रणपूर्व आणि मुद्रणोत्तर कालखंडात मराठी ग्रंथनिर्मितीची वाढ कशी होत गेली, त्यामागच्या प्रेरणा कोणत्या होत्या, ग्रंथलेखनाला व प्रकाशनाला कुणी, कसे उत्तेजन दिले, आतापर्यंत कोणकोणते ठळक ग्रंथप्रकार अस्तित्वात येऊन रूढ झाले, ग्रंथनिर्मितीचं तत्कालीन (म्हणजे महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या नंतरचं) स्वरूप कसं होतं व समस्या कोणत्या होत्या, वगैरे प्रश्नांची चर्चा करणारे पुस्तक तोपर्यंत मराठीत तरी लिहिले गेले नव्हते. ती विविधांगी चर्चा प्रथमच करणारा हा ग्रंथ विचारांना चालना देणारा ठरला होताच, पण आज पन्नास वर्षांचा काळ लोटल्यानंतरही आवर्जून विचारात घ्यावा असा आहे.

शं.गो. तुळपुळे यांच्या या ग्रंथात अवघी चारच प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये मुद्रणपूर्व काळात हस्तलिखित ग्रंथनिर्मिती कशी केली जात असे, धार्मिक प्रेरणेमुळे उत्स्फूर्तपणे ग्रंथनिर्मितीकडे जास्त कल असला तरीही स्वतःच्या मतांचे प्रतिपादन करण्यासाठी ती कशी वापरली जाई वगैरे मुद्द्यांचे विस्तृत व सोदाहरण विवेचन केले आहे. दुसऱ्या प्रकरणात मुद्रणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर गोवा, तंजावर, बंगाल वगैरे ठिकाणांहून सुरू झालेल्या मराठी ग्रंथनिर्मितीने कोणती वेगवेगळी वळणे घेतली आणि त्या प्रक्रियेला दिशा व गती देणाऱ्या यंत्रणा वा संस्था कोणकोणत्या होत्या यांचा ऐतिहासिक आढावा तपशिलांसह घेतला आहे.

तिसऱ्या प्रकरणामध्ये विविध साहित्यप्रकारांची व प्रमुख साहित्यिकांच्या कार्याची थोडक्यात माहिती तुळपुळे यांनी ओघवत्या शैलीत सांगितली आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, हरि नारायण आपटे, केशवसुत, अण्णासाहेब किर्लोस्कर, डॉ. श्री. व्यं. केतकर इत्यादींच्या ग्रंथनिर्मितीचा संकलित आस्वाद या प्रकरणामुळे वाचकांना घेता येतो. सगळ्यात महत्त्वाचे आहे ते ग्रंथामधले शेवटचे, सगळ्यांत मोठे प्रकरण- ‘ग्रंथनिर्मितीविषयक काही प्रश्न’. या ६८ पानी प्रकरणात लेखक-प्रकाशक-ग्रंथविक्रेता आणि वाचक या प्रमुख घटकांशी संबंधित विविध प्रश्नांचा मागोवा तर घेण्यात आला आहेच, पण काही काही समस्यांवरचे संभाव्य उपायही लेखकाने सुचवले आहेत. मायमराठीबद्दल आस्था बाळगणाऱ्यांनी मुळातून अवश्य वाचावा, असा हा ग्रंथ आहे.

(हा ग्रंथ महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेकडे उपलब्ध आहे. मूल्य - २५० रु.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.