26685
‘सुगम संगीत गीतांजली’ प्रेरणादायी
डॉ. गुरुराज कुलकर्णी ः कुडाळात पुस्तक प्रकाशन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः सुगम संगीत गीतांजली ही पुस्तिका सुगम संगीत तसेच उपशास्त्रीय अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरली आहे. निरनिराळ्या प्रकारच्या अनेक गीतांचा एकत्रित असा संग्रह सरावासाठी तसेच परीक्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी सुगम संगीत गीतांजली पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी केले.
श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगाव यांच्यावतीने सुगम संगीत परीक्षा अभ्यासक्रमाशी उपयुक्त विविध प्रकारच्या गीतांचा समावेश असणाऱ्या ‘सुगम संगीत गीतांजली’ पुस्तकाचे प्रकाशन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे अध्यक्ष व सुगम संगीत गीतांजलीचे संग्राहक राजाराम गव्हाणकर, विद्यालयाचे उपाध्यक्ष भास्कर गुंजाळ, डॉट कॉम असोसिएशनचे अध्यक्ष संजय बगळे, माजी केंद्रप्रमुख उदय शिरोडकर, सदस्य राणी गव्हाणकर, डॉ. राहुल गव्हाणकर, तन्वी गव्हाणकर, प्राजक्ता गव्हाणकर,
ध्रुवा नेमळेकर, वेदांत पंडित आदी उपस्थित होते. संजय बगळे यांनी, सर्व गीतांचा अनोखा संगम पुस्तकाचे संग्राहक राजाराम गव्हाणकर यांनी सुंदररित्या मांडला आहे.
---
संग्रहात भावविश्व सुरेख करणारी गीते
गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर म्हणाले, ‘‘अवघे भावविश्व सुरेख करणारी या संग्रहातील गीते मराठी मनाचा अमूल्य ठेवा आहे. सर्वसामान्य माणसालाही गुणगुणाविशी वाटणारी ही गीते प्रयत्नपूर्वक संग्रहित करून या पुस्तकाच्या रूपाने गीतगंगा सर्वांसोबत आणली आहे. त्यामुळे केवळ सुगम संगीताच्या परीक्षार्थींनाच नाही तर, प्रत्येक संगीतप्रिय माणसासाठी सुद्धा हागीतसंग्रह उपयुक्त ठरणार आहे. संगीत जीवनाचे अभिन्न अंग आहे. सकाळचे वातावरण प्रसन्न करणारी भूपाळी किंवा भक्ती गीते असो की मनातील भावनेचे शब्दसुरांद्वारे प्रकटीकरण करणारी भावगीते, ही सर्व अभावाने कानावर पडणारी गीते जतन करून नवीन पिढीपर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे.’’