आळे येथे बाल आनंदी बाजार
esakal February 25, 2026 06:45 AM

आळेफाटा, ता. २३ : आळे (ता. जुन्नर) येथील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व्यवहारज्ञान आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ येथे आयोजित करण्यात आलेला बालआनंदी बाजार आणि खाऊगल्ली हा उपक्रम पार पडला. द्विशताब्दी महोत्सव साजरा करणाऱ्या या शाळेने राबविलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे महत्त्वपूर्ण धडे मिळाले.
या आनंदी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. साबुदाणा वडा, ढोकळा, मंच्युरियन, दुधाचे पदार्थ यांसारख्या चविष्ट खाद्यपदार्थांसह ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये, मसाले, मिठाई, कपडे तसेच घरगुती वाळवणाचे पदार्थ यांचीही रेलचेल पाहायला मिळाली. एकूण ५० हून अधिक स्टॉल्समुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता.
पालक आणि ग्रामस्थांनी बाजाराला भेट देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी केली. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता आणि आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळेने घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक आनंददायी व जीवनाभिमुख होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास यावेळी माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सपना शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माऊली शेजवळ, केंद्रप्रमुख अनिता कुऱ्हाडे, अंगणवाडी सेविका संध्या वाघोले, मुख्याध्यापिका राजश्री कांबळे आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.