स्थायी समितीची ६ मार्चला नियुक्ती
esakal February 26, 2026 04:45 AM

पनवेल, ता. २५ (बातमीदार) : महापालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा ६ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती पनवेल पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी बुधवारी (ता. २५) दिली. त्यांनी जाहीर केलेल्या विषयपत्रिकेनुसार, या सभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, तसेच स्वीकृत नगरसेवक अशा महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या सभेत स्थायी समितीच्या रचनेनुसार १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीचे सदस्य निश्चित करण्यात येतील. तसेच स्वीकृत नगरसेवकांची निवडही या सभेत होणार असल्याने महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीत स्थान मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये चूरस वाढली असून विविध पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामुळे पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.