कोल्हापूर : राजारामपुरी जनता बझारच्या मागील बाजूला बस रूटवर शाहूकालीन ऐतिहासिक विहीर आहे. सुमारे १५० फूट खोल असलेल्या विहिरीचे बांधकाम दगड व चुना वापरून केले आहे. मात्र, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या या जलस्राेताभोवती झुडपे वाढली. त्यातील एक बाभळीचे मोठे झाड कठड्याच्या दगडासह विहिरीत कोसळले.
मानवी प्रयत्नांना मर्यादा असल्याने अत्याधुनिक क्रेनच्या साह्याने ते अलगद बाहेर काढले. अत्यंत जोखमीची ही कामगिरी जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह इतरांनी सहभाग घेतला.
Kolhapur Cleanliness : जलतीर्थांनी घेतला मोकळा श्वास;कोल्हापूरकरांच्या तीन पिढ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीमअत्यंत अडचणीत आणि सुमारे १५० फूट खोलीच्या या विहिरीत कोसळलेले झाड काढताना अत्याधुनिक क्रेनचा वापर करण्यात आला. तशी यंत्रणा पालिकेकडे नसल्याने रस्त्याने निघालेल्या एका अत्याधुनिक क्रेनला नगरसेवक संजय मोहिते व विकास भोसले यांनी थांबवून विहिरीत पडलेले झाड अलगद बाहेर काढले. क्रेनचालकाचे मानधन व या मोहिमेत सहभागी झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना चहा-नाश्त्याची व्यवस्था नगरसेवक मोहिते यांनी केली.
आपल्या भागात पाण्याचा चांगला साठा आहे, हे त्या भागातील नागरिकांना समजण्यास हा उपक्रम महत्त्वाचा आहे. जेणेकरून त्या साठ्याला कुणी बाधा पोहोचवत असल्यास त्याला रोखण्यास सुरुवात होईल. ‘सकाळ’ने खूप चांगला उपक्रम राबविला. भागातील नागरिक हा साठा जपण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.
- संग्राम घाटगे
Kolhapur Muncipal : महापालिकेतर्फे शुक्रवारी स्वच्छता मोहीम; महापौर रूपाराणी निकम, ‘सकाळ’च्या ‘जलतीर्थ स्वच्छता’ मोहिमेचा पुढील टप्पाहा उपक्रम छान आहे. आम्ही इतक्या वर्षांपासून ती विहीर पाहतो. त्यातील अस्वच्छता पाहत होतो. कुणी तरी पुढाकार घेऊन ती स्वच्छ करायला हवी, असे वाटत होते. ‘सकाळ’ने हा पुढाकार घेतला, ही महत्त्वाची बाब आहे. आपल्याजवळ पाण्याचीही उपलब्धता आहे, हे नागरिकांना समजणे गरजेचे होते. याप्रकारे केली गेलेली पाणवठ्यांची स्वच्छता सतत झाली पाहिजे.
- बीना कुलकर्णी
शाहूपुरी येथील ऐतिहासिक मुळे विहीर आता फारशी कुणाला माहिती नाही. या विहिरीत पाणी इतके आहे की पूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंबात येथे पाणी भरले जायचे. मात्र, वस्ती वाढली आणि ही विहीर इमारतीआड गेली. या विहिरीची गिर्यारोहणासाठी वापरणाऱ्या साहित्याचा वापर करून पस्तीस फूट उतरून साफसफाई केली.
स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्यासोबत परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. मुळे विहिरीवर महापालिकेचे दुकान गाळे असल्याने अनेकांना विहिरीचा विसर पडला आहे. भागातील वडीलधाऱ्या मंडळींनी स्वच्छतेच्या ठिकाणी भेट देऊन हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी आयोजित उपक्रमाचे कौतुक केले.
उपक्रमाच्या निमित्ताने केवळ स्वच्छता करून न थांबता शाहूपुरी युवक मंडळाने ही विहीर जतन करण्याचा निश्चय केला आहे. समिट ॲडव्हेंचर्सच्या टीमसह हिल रायडर्स फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही येथे उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
पर्यावरण रक्षणासाठी ‘सकाळ’चा नेहमीच पुढाकार असतो. आम्ही आज गिर्यारोहणाच्या निमित्ताने जिथे जिथे जातो तिथे कचऱ्याने पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असल्याचे विदारक वास्तव आहे. अशावेळी स्वच्छता मोहिमांची खरोखर आवश्यकता असून, यानिमित्ताने पुढच्या पिढीला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारे व्यासपीठच उपलब्ध होणार आहे.
- विनोद कांबोज,
समिट ॲडव्हेंचर्स शाहूपुरी युवक मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. ‘सकाळ’ने घेतलेल्या पुढाकारामुळे आमच्या भागातील एका जलसाठ्याच्या संवर्धनासाठी एकत्र आल्याचा आनंद आहे.
- संजय पाटील, सदस्य, शाहूपुरी युवक मंडळ