बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून पूर्वीची शिक्षा कायम
esakal February 28, 2026 12:45 PM

बार्शी सत्र न्यायालयाकडून मारहाण प्रकरणातील शिक्षा कायम
बार्शी शहर : आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा येथील उपाध्यक्ष केरू गव्हाणे यांना २९ सप्टेंबर २००७ रोजी हनुमंत सरडे, तुकाराम मेमाणे (मृत), काळू मेमाणे आणि देविदास दुरगडे (सर्व रा. चिकलठाण, ता. करमाळा) यांनी तलवारीने व काठीने मारहाण केली होती. या घटनेतील आरोपींना करमाळा येथील न्यायालयाने विविध कलमान्वये शिक्षा सुनावली होती. या सुनावणीविरुद्ध दाखल केलेले अपील बार्शीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळत करमाळा येथील न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली. केरू गव्हाणे यांना मारहाण केली होती. यात ते जखमी झाले होते. याबाबत तपास अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा करत करमाळा येथील प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपीना एकत्रित २ वर्ष ४ महिन्यांची शिक्षा आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या आरोपींनी दिलेल्या निकालाविरुद्ध बार्शीच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. मंगळवारी (ता. २४) बार्शीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी करमाळा प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत आरोपीचा अपील अर्ज फेटाळून लावला. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.