मुकाई चौक - नेटके वस्ती रस्त्याचे काम प्रलंबितच
esakal February 28, 2026 08:45 PM

रावेत, ता.२८ : अनेक वर्षांपासून मुकाई चौक ते नेटके चौक मार्गे शिंदे पेट्रोल पंप या मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीच्या वाढत्या ताणामुळे हा रस्ता तातडीने पूर्ण होण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवक, स्थानिक नागरिक, महानगरपालिका प्रशासन, नगररचना व स्थापत्य विभाग यांच्यात समन्वय साधून सविस्तर बैठक घेण्यात आली. बैठकीत नागरिकांचे अभिप्राय जाणून घेत रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींची माहिती देत काम लवकरच गतीने सुरू करून पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले.
रावेतमधील विविध वस्त्या, अंतर्गत रस्ते आणि कातळे वस्ती भागातील रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे पाठपुरावा करून प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या मुख्य रस्ता पूर्ण झाल्यास रावेत परिसरातील वाहतूक सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता प्रशासनाच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) चंद्रकांत मुठाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

रस्ता अपूर्ण असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, ही आमची मागणी आहे.
- अमोल कदम, रहिवासी

शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेष त्रास होतो. रस्त्याचे काम दर्जेदार आणि सुरक्षिततेच्या निकषांनुसार व्हावे.
- प्राजक्ता शिंदे, नागरिक

रावेत परिसर झपाट्याने विकसित होत आहे. मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्ते आणि कातळे वस्ती भागातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर होऊन कामे तातडीने पूर्ण व्हावीत.
- रोहित पाटील, युवक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.