निफाड: ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत निफाड तालुक्यात डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. सोनेवाडी खुर्द या गावाला तालुक्यातील पहिले ऑनलाइन रेशनकार्ड गाव’ म्हणून घोषित करण्यात आले असून, या उपक्रमामुळे शिधापत्रिका धारकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गावातील रास्तभाव दुकानाचे परवानाधारक ‘दुर्गामाता महिला बचत गट’ असून, सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे. शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी, आधार संलग्नता (जोडणी) आणि अंगठा पडताळणी (बायोमेट्रिक) प्रणालीद्वारे धान्य वितरणाची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना अंगठ्याच्या ठशावर धान्य मिळत असून, धान्य घेतल्यानंतर त्वरित मोबाईलवर एसएमएसद्वारे माहितीही पाठवली जाते.
गावात एकूण १११ शिधापत्रिका धारक असून त्यामध्ये १२ अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका (४५ सदस्य) आणि ९९ प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका (३७८ सदस्य) यांचा समावेश आहे. एकूण लाभार्थी सदस्यसंख्या ४२३ इतकी आहे. सर्व लाभार्थ्यांना आता रिअल-टाइम (तत्काळ) नोंद प्रणालीमुळे त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे.
डिजिटल युगात ई-शिधापत्रिका हे ‘स्मार्ट रेशन कार्ड’च्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे. व्यवहारातील पारदर्शकता वाढविण्यासोबतच धान्य वितरणाची अचूक नोंद ऑनलाइन पद्धतीने ठेवली जात असल्याने गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. नाव दुरुस्ती, सदस्य वाढविणे किंवा कमी करणे, माहिती अद्ययावत करणे ही कामेही आता ऑनलाइन सुलभ झाली आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी अतुल गायकवाड आणि पुरवठा निरीक्षक उल्हास टर्ले यांनी समन्वय साधला. ग्रामस्थ, महिला बचत गट आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा डिजिटल बदल शक्य झाला आहे.
सोनेवाडी खुर्दचे ‘ऑनलाइन रेशनकार्ड गाव’ म्हणून झालेले रूपांतर हे निफाड तालुक्यासाठी सकारात्मक पाऊल ठरत असून, ग्रामीण भागात डिजिटल व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.
१५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण होणार, पण...; राज्य सरकारने दिली महत्त्वाची माहितीडिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढते आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होतो. सोनेवाडी खुर्दने तालुक्यात आदर्श निर्माण केला. इतर गावांनीही या पद्धतीचा अवलंब करावा, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. शशिकांत मंगरूळे, प्रांताधिकारी, निफाड
महसूल समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून विविध सेवा गावपातळीवर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोनेवाडी गावातील जुनी, जीर्ण व फाटलेली शिधापत्रिका बदलून ई-शिधापत्रिका तयार करण्यात आल्या. नागरिकांना या शिधापत्रिका रेशनकार्ड व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) पोर्टलवरून डाउनलोड करता येतील. जनजागृतीसाठी कॅम्प मोडवर हा उपक्रम राबविण्यात आला.
- विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड