अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण : कोणता देश कोणाच्या बाजूने?
BBC Marathi March 03, 2026 11:45 AM
Getty Images

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जग दोन गटांत विभागल्याचं चित्र दिसत आहे.

काही देशांनी अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा दिला आहे, तर काही देशांनी इराणसोबत उभं राहण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान अनेक देश अतिशय सावध भूमिका घेत तटस्थ विधान करत आहेत. ते स्पष्टपणे कोणत्याही एका बाजूने बोलण्याऐवजी शांततेचं आवाहन करत आहेत.

शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

या संपूर्ण घटनेवर जगभरातील देशांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारताची प्रतिक्रिया

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (1 मार्च) उशिरा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीवर संवाद साधला.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी अलीकडील घडामोडींवर भारताची चिंता त्यांनी व्यक्त करत नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे, असं नमूद केले. संघर्ष शक्य तितक्या लवकर थांबवणे गरजेचे असल्याचंही मोदी म्हणाले.

Getty Images पंतप्रधान नरेंद्र मोदी

तत्पूर्वी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशीही चर्चा केली. यूएईवरील हल्ल्यांचा निषेध केला. तसेच, युएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे आभार मानले.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही शनिवारी एक निवेदन जारी करून आखाती प्रदेशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

इराण आणि आखाती प्रदेशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि तणाव न वाढवण्याचे आवाहन केले. सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला जावा, असं या निवेदनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.

ब्रिटनची भूमिका

ब्रिटनने इराणी क्षेपणास्त्र ठिकाणांवर "संरक्षणात्मक" कारवाईसाठी ब्रिटिश लष्करी तळांचा वापर करण्याच्या अमेरिकेच्या विनंतीला मान्यता दिली आहे. ही माहिती ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी दिली.

त्यांनी असंही म्हटलं की, ब्रिटनने इराकच्या 'चुकांमधून धडा' घेतला आहे. ब्रिटन इराणवरील सुरुवातीच्या हल्ल्यात सहभागी नव्हता आणि पुढील कारवाईतही सहभागी होणार नाही. मित्र राष्ट्रांच्या 'सामूहिक स्वसंरक्षणार्थ' आणि ब्रिटिश नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

X / Keir Starmer ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी एका व्हीडिओद्वारे निवेदन जारी केले

ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांनी संयुक्त निवेदन जारी करून मध्य पूर्वेतील देशांवर इराणने सुरू ठेवलेल्या हल्ल्यांबद्दल टीका केली.

ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर फ्रीड्रिख मर्त्स यांनी म्हटलं की ते मध्य पूर्वेतील आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास तयार आहेत.

युरोपीय देशांची भूमिका

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले आणि तेहरानने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर युरोपीय देशांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयेन यांनी म्हटलं की, युरोपियन संघाने इराणच्या "खूनी राजवटी" विरुद्ध व्यापक निर्बंध लादले आहेत. त्यांनी सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याचे आवाहन केले.

Getty Images युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन (फाइल फोटो)

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या कार्यालयाने इराणच्या सामान्य नागरिकांच्या बाजूने पाठिंबा दर्शवला. नागरी आणि राजकीय हक्कांच्या सन्मानासाठीचा त्यांचा प्रयत्न सुरू राहणार असल्याची भूमिका त्यांनी निवदेनाद्वारे मांडली.

तसेच, ताणतणाव कमी करण्यासाठीच्या दृष्टीने मेलोनी त्यांचे सहकारी आणि प्रादेशिक नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी इराणमध्ये दडपशाहीविरुद्ध संघर्ष करत असलेल्या लोकांना पाठिंबा दर्शवला आणि इराणला अण्वस्त्र मिळू न देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना समर्थन दिले.

आखाती राष्ट्रांच्या गटाचा इराणला इशारा

गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या (GCC) सदस्यांनी रविवारी सदस्य देशांवर इराणी हल्ल्यांमुळे झालेल्या हानीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. त्यात नागरी सुविधा आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवैत यांचा समावेश असलेल्या जीसीसीने या हल्ल्यांचा निषेध केला आणि इराणवर त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

Getty Images इराणला इशारा देणाऱ्या देशांमध्ये सौदी अरबचाही समावेश आहे.

जीसीसीने निवेदनाद्वारे इराणला हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं. तसंच स्वसंरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी शेजारी देशांना लक्ष्य केल्याचं नाकारलं आहे.

अल जजीरा या वृत्तवाहिनीला सांगितलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं की, "आम्ही पर्शियन आखाती देशांमधल्या आमच्या शेजाऱ्यांवर हल्ला करत नसून या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या उपस्थितीला लक्ष्य करत आहोत. त्यामुळे शेजारी देशांनी त्यांच्या तक्रारी या युद्धाचा निर्णय घेणाऱ्यांपर्यंत पोचत्या कराव्यात."

खामेनी यांच्या मृत्यूवर पाकिस्तानने काय प्रतिक्रिया दिली?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. या दु:खाच्या घडीत पाकिस्तानचे सरकार आणि जनता इराणच्या जनतेसोबत उभी असल्याचं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले की, "पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त करतो. कोणत्याही देशाच्या प्रमुखाला लक्ष्य केले जाऊ नये ही एक जुनी परंपरा आहे."

Getty Images पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

बीबीसी उर्दूनुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इराणवरील हल्ल्यांना "अत्यंत दुर्दैवी" म्हणत सहवेदना व्यक्त केल्या. तसेच, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्येही इराणवरील हल्ल्याचा स्पष्ट निषेध केला असल्याचं सांगितलं.

चीन आणि रशियाने काय प्रतिक्रिया दिली

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूवर आणि अमेरिका-इस्रायलने चीनवर केलेल्या हल्ल्यांवर चीनने निवेदन प्रसिद्ध चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की इराणचे सर्वोच्च नेत्यावरील हल्ला आणि त्यांची हत्या, इराणच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या मूल्यांचे गंभीर उल्लंघन आहे.

हे पाऊल संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरची उद्दिष्टे आणि मूल्यांविरोधात आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत नियमांविरोधात आहे. चीन या हल्ल्याचा तीव्र विरोध आणि निषेध करत आहे.

चीनने शांतता प्रस्थापित करण्याची अपील केली आहे. चीनने म्हटले आहे की तत्काळ लष्करी कारवाई रोखण्यात यावी. तणावपूर्ण स्थितीला आणखी चिघळू न देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. त्याचवेळी पश्चिम आशिया आणि पूर्ण जगात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी आम्ही आवाहन करत आहोत.

Getty Images अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर रशिया आणि चीननं प्रतिक्रिया दिली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

बीबीसी पर्शियनच्या वृत्तानुसार, पुतिन यांनी खामेनी आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांचा मृत्यू म्हणजे मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांविरोधात एक हत्या असल्याचे म्हटले.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने तत्काळ राजकीय आणि धोरणात्मक तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

रशियाने अमेरिका आणि इस्रायलवर या प्रदेशाला मानवी, आर्थिक आणि संभाव्य रेडियोलॉजिकल संकटाकडे ढकलल्याचा आरोप केला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
  • अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ल्याबाबत इराणनं काय सांगितलं? संघर्षात आतापर्यंत काय काय घडलं?
  • इराणचे नवीन सर्वोच्च नेते कधी आणि कसे निवडले जाणार? परराष्ट्रमंत्र्यांनी काय सांगितलं?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.