टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना दक्षिण अफ्रिका न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या स्पर्धेत हे संघ दुसऱ्यांदा भिडणार आहे. साखळी फेरीत दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली होती. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण अफ्रिकेचा संघ न्यूझीलंडवर कायम भारी ठरला आहे. त्यामुळे सर्व हिशेब चुकते करण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे. उपांत्य फेरीचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज घेतला जात आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर 8 फेरीचा शेवटचा सामना येथेच झाला होता. भारताने 196 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. म्हणजेच ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे हे स्पष्ट आहे. दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तर न्यूझीलंडचा संघ रडत रखडत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. पण उपांत्य फेरीचा सामन्याचा दिवस कोणाच्या पारड्यात कौल टाकतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार यात काही शंका नाही. विकेटवर चेंडूला चांगली उसळी मिळते आणि चेंडू बॅटवर येतो. त्यामुळे फलंदाजांना फटकेबाजी करण्यास मदत होते. ईडन्स गार्डन्सची खेळपट्टीचा अंदाज घेता नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेणं परवडेल. कारण दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल. तसेच दव फॅक्टरही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 4 मार्चला कोलकात्यात आकाश निरभ्र राहील. म्हणजेच पावसाची शक्यता नाही. त्यामुळे हा सामना 20 षटकांचा होणार हे निश्चित आहे. किमान तापमान 33 डिग्री सेल्सियस आणि कमाल तापमान 20 डिग्री सेल्सिअस असेल. त्यामुळे दुसऱ्या डावात दव असेल. भारत वेस्ट इंडिज सामन्यातही दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावून गेला होता. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण जातं. तसेच फलंदाजांना फटकेबाजी करण्याची संधी असते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारण्यावर भर असले.