करिअर कट्टा वर्धापन दिन
esakal March 04, 2026 03:45 AM

करिअर कट्टा वर्धापनदिन
विवा महाविद्यालयाची ११ पुरस्कारांवर मोहर

विरार, ता. ३ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करिअर कट्टाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यात विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विवा महाविद्यालयाने तब्बल ११ पुरस्कार पटकावत राज्यात सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे महाविद्यालय म्हणून मानाचा तुरा रोवला.
या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूषविले. कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. करुणा गोकर्ण, विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. अतुल साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या सोहळ्यात विवा महाविद्यालयाला उत्कृष्ट राज्यस्तरीय प्रथम महाविद्यालयाचा सन्मान मिळाला. प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांना उत्कृष्ट विभागीय समन्वयक पुरस्कार देण्यात आला. मुंबई विभागात प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट विभागीय महाविद्यालय, उत्कृष्ट करिअर संसद, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय असे विविध सन्मान महाविद्यालयाने पटकावले. राज्यस्तरीय रील स्पर्धा २०२५ मध्ये भावेश विधाते प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. एडब्ल्यूएस करिअर टूरमध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, जिल्हास्तरीय रील स्पर्धेतील विजेतेपद तसेच पालघर जिल्हास्तरीय स्पर्धेत चिन्मय भोईर यांचा द्वितीय क्रमांक अशा विविध यशांनी विवा महाविद्यालयाने एकूण ११ पुरस्कारांवर मोहर उमटवली.
पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर, व्यवस्थापन समिती सदस्य तसेच विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यात सर्वाधिक ११ पुरस्कार पटकावत विवा महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तेची आणि कर्तृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.