पदाधिकारी ओळखण्यात सर्वांचाच गोंधळ
esakal March 05, 2026 07:45 AM

पिंपरी, ता. ४ : महापालिका सभा असो वा स्थायी समिती. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ‘पदाधिकारी ओळखण्यात’ गोंधळाची स्थिती आहे. पालिकेत १२८ पैकी ६४ सदस्य नवीन असून त्यांचीही अद्याप एकमेकांशी पुरेशी ओळख झालेली नाही. त्यात ‘कडक पेहरावात’ उत्साही कार्यकर्त्यांचा सर्रास वावर असल्याने नगरसदस्य कोण आणि कार्यकर्ता कोण? काही कळेनासे झाले आहे.
महापालिका निवडणूक होऊन दीड महिना झाला. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करूनही महिना होत आहे. महापौरांसह कारभाऱ्यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे. स्थायीसह विषय समित्यांचा कारभार सुरू झाला आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेपासून कार्यकर्त्यांचा उत्साह वेळोवेळी दिसून आला आहे. शिवाय, महापालिकेतील बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. माहितगारांची संख्या तुलनेने कमी आहे. शिवाय, १४ मार्च २०२२ पासून अर्थात गेली चार वर्षे प्रशासकीय राजवट होती. क्वचित प्रसंगी ठराविक राजकीय प्रतिनिधी व माजी नगरसेवक महापालिकेत येत असायचे. या माजींमधील जवळपास निम्मे पदाधिकारी निवडून येऊ शकले नाहीत. बहुतांश नवीन चेहरे आहेत. त्यामुळे त्यांची ओळख अनेकांनी झालेली नाही. ही खंत सर्वसाधारण सभेत एका नवीन नगरसदस्यांनी बोलूनही दाखवली. सभागृहात एक ओळखसत्र घेण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, अद्याप ते झालेले नाही. या ओळखी- अनोळखीपणामुळे सभांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी अधिक दिसत आहे.

असे घडलेत प्रसंग
१) महापौर, उपमहापौर निवडीसाठी आयोजित सर्वसाधारण सभेत अनेक कार्यकर्त्यांनी थेट सभागृहात प्रवेश केला. त्यांत महिलांची संख्याही अधिक होती.
२) महापौर, उपमहापौर निवडीनंतर कार्यकर्त्यांचा थेट महापौरांच्या विशेष कक्षात प्रवेश
३) अधिकृतपणे निवड जाहीर होण्यापूर्वीच पक्षनेते कार्यालयात प्रवेश, पक्षनेत्यांकडूनही कामकाज सुरू
४) स्थायी समिती अध्यक्ष निवडीसाठी आयोजित विशेष सभेत कार्यकर्त्यांसह अन्य सदस्यांचाही प्रवेश
५) स्थायी समिती निवडीनंतर आयोजित अर्थसंकल्प बैठकीत सदस्यांनाच बसायला जागा नव्हती
६) विषय समिती सभापती निवडीसाठी आयोजित बैठकीवेळीही कार्यकर्त्यांची गर्दी

PNE26W00565

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.