कणकवलीत शनिवारी
तालुका वक्तृत्व स्पर्धा
कणकवली ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माध्यमिक विद्यालय, बिडवाडी येथे कणकवली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ७ मार्चला सकाळी ९ ते १२ या वेळेत विद्यालयाच्या सभागृहात होणार असून, यामध्ये कणकवली तालुक्यातील आठवी ते बारावीमधील विद्यार्थिनी सहभागी होऊ शकणार आहेत. विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्वक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने दिलीप रामचंद्र बिले पुरस्कृत विनिता दिलीप बिले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘सशक्त महिला, सशक्त भारत’ (महिला सक्षमीकरणाचे महत्त्व) या विषयावर ही स्पर्धा केंद्रित असेल. या उपक्रमात कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी आपल्या विद्यालयातील एका विद्यार्थिनीला सहभागी करावे, असे आवाहन बिडवाडी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई अध्यक्ष मधुकर वाडेकर, विद्यालयाचे प्राचार्य आनंदा कांबळे यांनी केले आहे.
--------
सावंतवाडीत आज
‘कल्पक’चे उद्घाटन
सावंतवाडी ः येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयाचे २८ वे वार्षिक कला प्रदर्शन ‘कल्पक’ भव्य स्वरुपात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध मान्यवर, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ, मार्गदर्शक, क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि आर्ट एज्युकेटर्स उपस्थित राहणार आहेत. उद्या (ता. ५) सायंकाळी सहाला प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय परीक्षक संतोष पारधी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध इलस्ट्रेटर, डिझायनर व आर्ट डायरेक्टर दिलीप खोमणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयातील प्रथम वर्षापासून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ६ ते ८ मार्चदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत खुले राहणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष रमेश भाट, प्राचार्य उदय बेले यांनी केले आहे.
------
कसालमध्ये १३ मार्चला
रोंबाट, राधानृत्य स्पर्धा
ओरोस ः शिमगोत्सवानिमित्त कसाल येथे १३ मार्चला रोंबाट व राधानृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. रोंबाट स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय २५ हजार, तसेच राधानृत्य स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार, ३ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि पावणाई रवळनाथ मित्रमंडळाच्यावतीने आयोजित ही स्पर्धा सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत कसाल बाजारपेठ येथे होणार आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील स्पर्धकांनी संपर्क साधावा. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोंबाट व राधानृत्य पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.................
सोनुर्लीत आज
‘करीन ती पूर्व’
सावंतवाडी ः श्री देवी माऊली बालमोहन नाट्यमंडळ, सोनुर्ली येथे श्री देवी माऊली कुळघर रंगमंचावर होळी उत्सवानिमित्त उद्या (ता. ५) रात्री १२ वाजता लेखक भार्गवराव विश्वासराव वरेरकर व दिग्दर्शक मुकुंद परब यांचे चार अंकी नाटक ‘करीन ती पूर्व’ सादर होईल. तसेच शनिवारी (ता. ७) रात्री १२ वाजता लेखक अरविंद रुदेंकर, योगेश गावकर यांचे दोनअंकी नाटक ‘तूच माझा पाठीराखा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.