इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी,अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
Marathi March 06, 2026 12:25 AM

नवी दिल्ली : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण संघर्ष सुरुच आहे. या दरम्यान इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कोरकडून एक मोठी खेळी करण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीनं ही दिलासादायक बाब आहे. इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी केवळ अमेरिका, इस्त्रायल आणि  यूरोप आणि त्यांच्या पाश्चिमात्य सहयोगी देशांच्या जहाजांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.  इराणची सरकारी प्रक्षेपण संस्था आईआरआयबीच्या द्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. 

इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कोरकडून या संदर्भात स्पष्टपणे इशारा दिला आहे. जर, अमेरिका, इस्त्रायल आणि यूरोप किंवा त्यांच्या समर्थक देशांचं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून नेण्याचा प्रयत्न केल्यास त्या जहाजांवर हल्ला करण्यात येईल आणि ती नष्ट करण्यात येतील. बुधवारी आयरजीसीनं होर्मुझची सामुद्रधुनी फक्त चीनसाठी बंद नसल्याचं जाहीर केलं होतं. आता मात्र, इराणच्या नव्या घोषणेमुळं भारताला देखील दिलासा मिळणार आहे. 

इराणच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय कायदे आणि संदर्भातील प्रस्तावांनुसार युद्ध काळात इस्लामिक गणराज्य इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण अधिकार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. 

अमेरिका आणि इस्त्रायल यांनी शनिवारपासून इराणच्या विरुद्ध लष्करी कारवाई सुरु केली होती. त्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑईलचे दर वाढले होते आणि जगभरातील ऊर्जा संसाधनांच्या पूर्ततेवर संकट निर्माण झालं होतं. 

इराणकडून बुधवारी फक्त चीनचे झेंडे असणाऱ्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. इराणच्या अधिकाऱ्यांनी युद्धासाठी चीनकडून पाठिंबा देण्यात आल्यानं आणि सहानुभूतीपूर्वक भूमिका ठेवल्याबद्दल आभार मानण्यात आले होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगभरातील तेल वाहतुकीच्या 20 टक्के वाहतूक केली जाते. 
 
इराणनं इस्त्रायल आणि अमेरिकेविरुद्ध संघर्ष सुरु झाल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे जलमार्ग बंद केले आहेत. सागरी ट्रॅकिंग वेबसाईटच्या लाईव्ह डेटानुसार कुवेत जवळ आणि दुबईच्या किनाऱ्याजवळ शेकडो टँकर आणि जहाज थांबलेली आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पूर्व बाजूला अब्बास बंदराजवळ इराण सज्ज आहे. तज्ज्ञांच्या मते होर्मुझच्या सामुद्रधुनीला इराणनं बंद केल्यानं आशिया आणि यूरोपच्या मुख्य सागरी मार्गांवर परिणाम होणार नाही. मात्र, तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. होर्मुझची सामुद्रधुनी इतिहासात पहिल्यांदा कर्मशिअल जहाजांसाठी बंद करण्यात आली आहे. 1980-88 च्या इराण आणि इराक युद्धात देखील टँकरवर हल्ले होत असले तरी वाहतूक सुरु होती. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.