दुसऱ्या दिवशीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
esakal March 06, 2026 04:45 AM

आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच
एक महिन्याचा पगार तातडीने देण्याचे आश्वासन; नगरसेविका डॉ. तनुजा वायले यांची मध्यस्थी
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यापासून वेतन थकल्याने पुकारलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. मात्र, नगरसेविका डॉ. तनुजा वायले आणि शालिनी वायले यांनी आंदोलक आणि प्रशासनामध्ये मध्यस्थी केल्यानंतर, महापालिकेकडून एका महिन्याचे वेतन तातडीने देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

एनएचएम (राष्ट्रीय आरोग्य अभियान) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या एक वर्षापासून नियमित होत नसल्याची मोठी तक्रार आहे. नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील पगार अद्याप मिळालेला नाही. जुलै २०२५ पासून लागू झालेल्या वेतनवाढीचा लाभही कर्मचाऱ्यांपासून दूर आहे. एएनएम आणि जीएनएम यांची रिक्षा बिले, सपोर्ट ग्रुपचे मानधन आणि ‘आरोग्य वर्धिनी’ योजनेची बिलेही प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू असताना डॉ. तनुजा वायले आणि शालिनी वायले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या आयुक्त आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यासमोर मांडल्या. प्रशासनाने स्पष्ट केले की, एनएचएम कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून येते, त्यामुळे विलंब झाला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण लक्षात घेता, एका महिन्याचा पगार महापालिकेच्या निधीतून तातडीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय निधीला विलंब होत असला, तरी कर्मचाऱ्यांची अडचण पाहून महापालिका स्वहस्ते एक महिन्याचे वेतन तत्काळ अदा करेल, अशी प्रतिक्रिया महापालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे.

प्रोत्साहन भत्त्याची मागणी
ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर यांसारख्या शेजारील महापालिकांमध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांना सुमारे १५ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. केडीएमसीत मात्र हा भत्ता मिळत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यावर बोलताना डॉ. तनुजा वायले म्हणाल्या की, ‘‘मी स्वतः डॉक्टर असल्याने या कर्मचाऱ्यांच्या समस्या मला ठाऊक आहेत. इतर महापालिकांप्रमाणे येथेही प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यासाठी मी महासभेत प्रस्ताव मांडणार आहे.’’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.