जिल्ह्यातील कांदा उत्पादक, निर्यातदार अस्वस्थ
esakal March 06, 2026 04:45 AM

चाकण, ता. ५ : ‘‘जिल्ह्यातून निर्यात होणारा सुमारे दीड हजार टन कांदा मुंबई येथील जवाहरलाल नेहरू (जेएनपीटी) बंदरावर
पडून आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्याचा फटका बसल्याने कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेले कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे,’’ असे चाकण (ता. खेड) येथील कांदा व्यापारी जमीरभाई काझी यांनी सांगितले.

दुबई येथे कांदा निर्यात कधी सुरू होणार? तेथील बाजारपेठ कधी खुली होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी तसेच निर्यातदार अस्वस्थ झाले आहेत. कांदा प्रामुख्याने दुबईमार्गे आखाती प्रदेशांत निर्यात केला जातो. युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने कांदा कंटेनरमध्ये अडकून पडला आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे.


बाजारभाव होणार कमी
देशांतर्गत कांदा अधिक प्रमाणात विकावा लागला तर कांद्याचे बाजारभाव कमी होईल व प्रतिकिलो दहा रुपयांपेक्षाही कमी बाजारभाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल, असे कांदा निर्यातदार, व्यापारी प्रशांत गोरे पाटील, व्यापारी माणिक गोरे, राम गोरे यांनी सांगितले.

युद्धजन्य परिस्थितीत कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये तात्काळ अनुदान जाहीर करावे. निर्यात सुरू होईपर्यंत केंद्र सरकारने तात्पुरती खरेदी योजना जाहीर करावी.
- गजानन गांडेकर, शेतकरी बचाव आंदोलन संघटना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.