तौबा-तौबा… तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं
Marathi March 06, 2026 02:25 PM

IND vs ENG T20 विश्वचषक उपांत्य फेरी : वानखेडेच्या मैदानावर रंगलेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात थरारक लढत पाहायला मिळाली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद तब्बल 253 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडसमोर अवघड लक्ष्य ठेवले. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जेकब बेथेलने 48 चेंडूत 105 धावांची झंझावाती खेळी करत इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या, पण अखेरीस जसप्रीत बुमराहच्या अचूक आणि धारदार गोलंदाजीपुढे इंग्लिश फलंदाज टिकू शकले नाहीत. विशेषतः 16व्या आणि 18व्या षटकात बुमराहने कसून गोलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला आणि अखेरीस भारताने 7 धावांनी विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारताचा फलंदाज संजू सॅमसन आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोरदार स्तुती केली आहे. अख्तरच्या मते, सध्या संजू ज्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे, त्यामागे गौतम गंभीर यांची मोठी भूमिका आहे. पाकिस्तानी चॅनलवर बोलताना अख्तर म्हणाला की, संजूला संघात संधी मिळवून देण्यासाठी गंभीरने खूप प्रयत्न केले. त्याने संजूला अक्षरशः लढून टीममध्ये स्थान मिळवून दिले.

काय म्हणाला शोएब अख्तर? (काय म्हणाला शोएब अख्तर?)

अख्तर म्हणाला की, “संजू 2014 पासून टीम इंडियाशी जोडलेला आहे, पण तो सतत संघात ये जा करत होता. 2015 मध्येही संजूचे नाव खूप चर्चेत होते. मात्र त्या वेळी महेंद्रसिंह धोनी संघात प्रमुख विकेटकीपर असल्यामुळे संजूला संघात कायमस्वरूपी स्थान मिळणे खूप कठीण होते. त्यामुळे त्याला आपल्या संधीसाठी खूप काळ वाट पाहावी लागली.”

यानंतर अख्तरने गंभीरचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला, “आज संजू टीम इंडियात आहे, याचे संपूर्ण श्रेय गौतम गंभीरला जाते. गंभीरने संजूला संघात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्या निवडीवर टीकाही झाली, पण गंभीर ठाम राहिला आणि त्याने संजूला संघात खेळवले.”

अख्तर पुढे म्हणाला, “गंभीर हा खरा मास्टरमाईंड आणि खूप हट्टी स्वभावाचा माणूस आहे. त्याला एखादा खेळाडू संघासाठी योग्य वाटला, तर तो कोणत्याही परिस्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवतो. संजू खरोखरच कमाल फलंदाज आहे. विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध तो ज्या प्रकारे फटके मारत होता ते पाहून ‘तौबा-तौबा’ वाटत होते. तो जबरदस्त खेळाडू आहे.”

संजूने आतापर्यंत 4 डावांत ठोकल्या 232 धावा (Sanju Samson Performance T20 World Cup 2026)

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये संजू सॅमसनने 89 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 253 धावांचा मोठा स्कोअर उभारला. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही संजूने नाबाद 97 धावांची दमदार खेळी केली होती. या स्पर्धेत संजूने आतापर्यंत 4 डावांत एकूण 232 धावा केल्या आहेत आणि तो भारतीय फलंदाजीचा प्रमुख आधार बनला आहे.

हे ही वाचा –

IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.