Mi Savitribai Jyotirao Phule serial new leap cast details: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग ही मालिका आवर्जून पाहत आहे. या मालिकेतून सावित्रीबाई आणि जोतीरावांचा खडतर प्रवास दाखवण्यात येत आहे. बालपण ते समाजसुधारकपर्यंतचा प्रवास, त्यांनी अनेक विरोधांचा सामना करत समाज घडवला. बालपण, सावित्रीमाई आणि जोतीराव यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यात घडलेले प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न, यासह जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठी धडपड हे सारं काही या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. थोर व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले आणि जोतीराव यांचा खडतर प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे.
अशातच ही मालिका आता नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच या खास मालिकेतून सावित्रीबाई आणि जोतीराव यांचं तरुणपण कसं होतं? तारुण्यावस्थेतील नवा अध्या अनुभवायला मिळणार आहे. मालिकेच्या या नवीन टप्प्यात समाजात असणारी रुढी आणि परंपरेची आव्हाने, सावित्रीबाईंचं शिक्षण, त्यांचं स्वावलंबी होणं, जोतीरावांची यासाठी होणारी धडपड, हे सगळं या मालिकेतून प्रेक्षकवर्गाला पाहायला मिळणार आहे.
विरोध असताना जोतीरावांनी समाजाची चौकट मोडण्याचं दाखवलेलं धैर्य हे खरंच वाखणण्याजोगं आहे, आणि हीच माहिती या मालिकेतून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. नव्या पिढीला यातून बरंच काही शिकता येईल, मालिकेतलं हे पर्व नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही.
मालिकेच्या या नव्या टप्प्यात अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. अभिषेक देशमुखला खरी ओळख आई कुठे काय करते या मालिकेतून मिळाली होती. तर, सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री राजसी भावे साकारणार आहे. या भूमिकेविषयी माहिती देताना अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या आयुष्यातली ही पहिली मालिका. पहिली मालिका तेही स्टार प्रवाहसोबत.. महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाईंची भूमिका साकारायला मिळणं, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.. तक्षा शेट्टीनं या मालिकेत सावित्रीबाईंच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तिनं ही भूमिका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. तिच्याकडून भरपूर गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. थोड्या काळासाठी का होईना, ही भूमिका साकारायला मिळणं, माझ्यासाठी पर्वणीच..', असं अभिनेत्रीनं म्हटलंय.
तर, जोतीरावांची भूमिका साकारणारा अभिषेक देशमुख म्हणाला, 'इतक्या महान व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळत आहे, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. ही मालिका मला प्रचंड आवडते. पहिल्या एपिसोडपासून ही मालिका मी न चुकता पाहतो. या मालिकेची कथा अभ्यासपू्र्वक लिहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा या मालिकेसाठी मला विचारणा झाली, तेव्हा मला फार अभ्यास करावा लागला नाही. मालिका मी पाहत होतो. या कथेतूनच माझा सराव झाला होता. आई कुठे काय करते, या मालिकेनंतर मी पुन्हा स्टार प्रवाह परिवारात सामील होतो आहे. माझ्यासाठी खरंच दुग्धशर्करा योग आहे', असं अभिषेक म्हणाला.