आळेफाटा, ता. ६ ः आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूलमधील शिक्षक संतोष सहाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी दिवंगत सुकाशेठ जाधव (फुलवाले) यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त पुणे जिल्हा पत्रकार संघ व आंबेगाव तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शासकीय, वैद्यकीय, उद्योजकता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा २८ फेब्रुवारीला जाधववाडी (रांजणी, ता. आंबेगाव) येथे आयोजित केला होता.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष सहाणे यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते सहाणे यांना मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन स्व. सुकाशेठ जाधव (फुलवाले) स्मृती गौरव सोहळा समिती जाधववाडी, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ, आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघ व समस्त ग्रामस्थ जाधववाडी यांच्याद्वारे करण्यात आले होते.