उत्रौली, ता. ६ : शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु करण्याआधी पासूनच मुलांच्या विश्वातील महत्त्वाचा खेळ ‘आई’ या शब्दापासून सुरू होतो. ‘आई माझे पत्र हरविले’ या खेळामध्ये ‘आई’ला केलेली आर्जव चिमुकल्यांचे भावविश्व भरून टाकणारी आहे. हा शब्द उच्चारताच अनेक उत्तरे मिळणार ही आपली भावना असल्याने मुलांना ‘आई’ अतिशय जवळची व्यक्ती वाटते.
‘आई’ म्हणजे मुलांच्या भावविश्वाचा पहिला आधार. तिच्या मायेच्या कुशीतच प्रेम, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची पहिली जाणीव रुजते. मुलांच्या प्रत्येक आनंदात ती हसते, प्रत्येक वेदनेत निःशब्दपणे साथ देते. आईचे नाते हे शब्दांपलीकडचे असते. त्याग, माया आणि न संपणाऱ्या प्रेमाने विणलेले असते. तिच्यामुळेच मुलांचे जग सुंदर बनते. तिच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पळसोशी (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आई बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा ‘आईस पत्र’ हा उपक्रम राबिवण्यात आला. श्री स्वामी समर्थ ग्रुप-भोर यांच्या आयोजनातून संतोष कदम यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना कोरी पोस्ट कार्ड देण्यात आली. तंत्रज्ञानाच्या युगात पोस्टकार्डवर ‘आई’ विषयी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मुलांना प्राप्त झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून पत्रलेखनाचा विशेष आनंद मुलांनी घेतला. ज्यांची आई लहानपणीच सोडून गेली त्यांनी आपले संगोपन करणाऱ्या आजी, काकूला पत्र लिहिले आहे.
पळसोशीच्या शाळेबरोबरच वीसगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद शाळा धावडी, रामोशीवाडी, हातनोशी, खानापूर, भाबवडी या शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक शाळेतून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांस बक्षीस म्हणून स्कूल बॅग देण्यात आली. सेवानिवृत्त प्राचार्य रमेश बुदगडे, सरपंच अमर बुदगुडे, मंगेश दरेकर यांचे उपक्रमास सहकार्य लाभले.
आईचे डोळे निश्चित पाणावतील
विद्यार्थ्यांनी आपल्या आई बद्दलचे प्रेम, कृतज्ञता आपल्या मनातील भावना, पत्रामध्ये लिहिल्या. सर्व पत्रे शिक्षकांमार्फत नजीकच्या टपाल कार्यालयामध्ये टाकण्यात आली. ही पत्रे विद्यार्थ्यांच्या आईला पोस्टामार्फत मिळतील, तेव्हा आपल्या मुलांच्या मनात आपल्या आई विषयी असणारे कृतज्ञता भाव वाचून प्रत्येक आईचे डोळे निश्चित पाणावतील.
अशा संस्कारक्षम उपक्रमातून मुलांच्या बालमनावर सकारात्मक परिणाम होतील. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात आई बद्दलचे प्रेम अधिक दृढ होईल असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल दानवले, शिक्षिका नूतन दानवले यांनी व्यक्त केला.
धावडी (ता. भोर) : मीनल गोळे हिने आपल्या आईच्या निधनानंतर संगोपन करत असलेल्या आज्जीबद्दल ऋण व्यक्त करणारे लिहिलेले पत्र.