मळगावमध्ये १३ पासून ''लोक-सिंधू महोत्सव''
esakal March 07, 2026 10:45 AM

मळगावमध्ये १३ पासून ‘लोक-सिंधू महोत्सव’
पंढरी परब ः खाद्यजत्रेसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ चे आयोजन १३ ते १५ मार्च या कालावधीत मळगाव येथे केले आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यावतीने मळगाव येथील माई इन्स्टिट्यूटच्या परिसरात हा भव्य सोहळा पार पडणार असल्याची माहिती लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक पदार्थांना जागतिक ओळख मिळवून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. याविषयी माहिती देताना श्री. परब यांनी सांगितले की, ‘‘सावंतवाडी आणि जिल्ह्याची खाद्यसंस्कृती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. यापूर्वी बेळगाव येथे घेतलेल्या कोकणी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता मळगाव येथील तीन एकर परिसरात हा सोहळा होत आहे. येथील माई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या माध्यमातून प्रशिक्षित शेफ या महोत्सवात आपले कसब दाखवणार आहेत.’’
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी ५.३० वाजता मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. यात ‘सिंधू सुंदरी’ फॅशन शो, खेळ पैठणीचा, कराओके आणि नृत्य स्पर्धा, लहान मुलांसाठी ‘मस्ती अँड मॅजिक’, गृहिणी आणि तरुणांसाठी मॉकटेल्स, शेक्स, केक्स आणि कुकीज बनवण्याची विशेष कार्यशाळा होईल.
शनिवारी (ता. १४) ‘देवधून’ लाईव्ह बँडचा कार्यक्रम, तर महोत्सवाच्या अंतिम दिवशी रविवारी (ता. १५) राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांची भव्य लाईव्ह कॉन्सर्ट होईल. महोत्सवात उभारण्यात येणाऱ्या भव्य खाद्य जत्रेत कोकणी पदार्थांची मेजवानी असेल. महिला बचतगट आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी ‘ग्राहक बाजार’ अंतर्गत विशेष स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. विशेष कार्यशाळांसाठी प्रवेश मर्यादित असून, इच्छुक नागरिकांनी १२ मार्चपूर्वी नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजक अनिरुद्ध दास, अरविंद आणि प्रा. अमेय महाजन यांनी केले.
यावेळी महेश तानावडे, प्रवीण प्रभूकेळुस्कर, साक्षी मयेकर, प्राचार्य अनिरुद्ध दास, प्राचार्य अमेय महाजन आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.