Amitabh Bachchan: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या कामाबद्दल जितकी चर्चा होते तेवढीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल होते. सध्या चर्चा आहे ती अमिताभ बच्चन यांच्या अयोध्येतील जमीन खरेदीची. बिग बींनी राम जन्मभूमीत आणखी एक मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. तब्बल 35 कोटी रुपयांना 2.68 एकर जमीन विकत घेतली आहे. त्यांनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्यासोबत हा व्यवहार झाला. कंपनीने 6 मार्च रोजी ही माहिती दिली. अयोध्येतील हा अमिताभ बच्चन यांची तिसरी गुंतवणूक आहे.
काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन हाही त्याच्या एका व्यवहारामुळे चर्चेत आला होता. अभिषेकने साउथ मुंबईतील उच्चभ्रू प्रीमियम रियल इस्टेट मानला जाणाऱ्या महालक्ष्मी भागातील सी फेसिंग फ्लॅट विकला होता. आता अमिताभ बच्चन यांच्या जमीन खरेदीची एकच चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींनी घेतलेली ही जमीन 75 एकरांच्या ‘द सरयू’ प्रकल्पाजवळ आहे. या व्यवहाराची प्रक्रिया AB Corp Ltd चे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांनी पूर्ण केल्याचे कंपनीने सांगितले. ते पुढे म्हणाले की, अयोध्येत सुरू असलेले पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प, सार्वजनिक गुंतवणूक आणि वाढत असलेला विकास यामुळे हे शहर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरत आहे.
या गुंतवणुकीबद्दल बोलताना हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की, “अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक ही जमीन केवळ आर्थिक मालमत्ता नसून पुढच्या पिढ्यांसाठी टिकून राहणारा वारसा असल्याच्या आमच्या विश्वासाला बळ देते. अयोध्येसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक शहरात या वारशाला अधिक खोल अर्थ प्राप्त होतो.”
अयोध्येतील ही अमिताभ बच्चन यांची तिसरी गुंतवणूक आहे. यापूर्वी मे 2025 मध्ये त्यांनी ‘द सरयू’ प्रकल्पाजवळ सुमारे 25 हजार चौरस फूटांचा प्लॉट जवळपास 40 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्याआधी 2024 मध्ये त्यांनी याच प्रकल्पात 10 हजार चौरस फूटांचा प्लॉट सुमारे 14.5 कोटी रुपयांना घेतला होता.
अयोध्येशिवाय अमिताभ बच्चन यांनी HoABL च्या Sol De Alibaug या प्रकल्पातही गुंतवणूक केली आहे. येथे त्यांनी सुमारे 10 कोटी रुपयांना 10 हजार चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. या प्रकल्पात क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन यांनीही गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते.
गेल्या काही वर्षांत अयोध्येचा वेगाने विकास होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, सुधारलेले रस्ते आणि रेल्वे संपर्क तसेच राम मंदिर उभारणीमुळे शहरात गुंतवणूक वाढली आहे. अहवालानुसार 2020 ते 2025 दरम्यान सरयू नदीकिनारी आणि राम मंदिर परिसरातील जमिनीच्या किमतींमध्ये सुमारे 4.5 पट वाढ झाली आहे.