Nanded Crime News: नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
नांदेड शहरातील हडको परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. आकांक्षा ही शिक्षणासाठी नांदेड येथे राहत होती. तिचे आई-वडील वीटभट्टीवर मजुरी करून उदरनिर्वाह करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही गेल्या दोन वर्षांपासून हडको परिसरातील एका इमारतीत कॉट बेसिसवर सुरू असलेल्या वसतीगृहात राहत होती. हे वसतीगृह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश चिटणीस तथा माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी दुपारी आकांक्षा वसतीगृहातील तिच्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतीगृह चालक जीवन घोगरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून वसतीगृहाची थकीत फीस भरण्यासाठी घोगरे वारंवार तगादा लावत होते. त्यामुळे मुलीला मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली,” अशी तक्रार आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी पोलिसांकडे दिली.
या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवन घोगरे पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित वसतीगृहात सुमारे 40 हून अधिक मुली कॉट बेसिसवर राहत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक विद्यार्थिनींकडून दरमहा सुमारे अडीच हजार रुपये वसूल केले जात असल्याचेही सांगितले जाते. या वसतीगृहाला अधिकृत परवानगी नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी काही काळ पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत. जीवन घोगरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने व निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. पक्ष फुटीनंतर ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले होते. त्यांनी नांदेड महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा