पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ पण पत्नीच्या मनाचा थांग लागला नाही, नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
अनिरुद्ध जोशी March 07, 2026 06:43 PM

Nashik Crime News: नाशिक शहरातून अत्यंत धक्कादायक आणि घटना समोर आली आहे. शहरातील प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Manisha Jejurkar) यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ असल्याने या घटनेने अनेकांना स्तब्ध केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात कुटुंबासह राहत होत्या. शहरातील शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घरात शुक्रवारी त्यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली.

Nashik Crime News: अनुभवी आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून डॉ. मनीषा जेजुरकरांची होती ओळख

डॉ. मनीषा जेजुरकर या शहरात एक कुशल आणि अनुभवी आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जात होत्या. आयुर्वेदिक उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना उपचार देत आरोग्याचा मार्ग दाखवला होता. त्यांच्या उपचारपद्धतीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे रुग्णांमध्येही त्या लोकप्रिय होत्या. अशा एका अनुभवी आणि यशस्वी महिला डॉक्टरने अचानक आयुष्य संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Nashik Crime News: पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ

या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक तणाव, नैराश्य आणि इतर मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ते मार्गदर्शन करून उपचार देत असतात. समाजात मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्याचेही त्यांचे काम सुरू असते. मात्र मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांच्या घरातच अशी दुर्दैवी घटना घडल्याने अनेकांना नियतीचा हा विचित्र खेळ वाटत आहे.

Nashik Crime News: आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट

दरम्यान, या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच गंगापूर रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळली आहे की नाही, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनेमागील कारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

Nashik Crime News: पोलिसांकडून तपास सुरु 

नेमक्या कोणत्या मानसिक तणावामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे डॉ. मनीषा जेजुरकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास गंगापूर रोड पोलीस करत आहेत. यासाठी पोलिसांकडून कुटुंबीय, शेजारी तसेच परिचितांचे जबाब नोंदवले जात आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून एका अनुभवी आणि कर्तबगार महिला डॉक्टरच्या जाण्याने शहराच्या आरोग्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

आणखी वाचा 

Nashik Bribe News: 1 कोटी 25 लाखांची मागितली लाच, नाशिकमध्ये जीएसटीचे मोठे मासे ACB च्या गळाला; नेमकं प्रकरण काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.