Pune Crime News : पुण्यात शिवाजीनगर भागात एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विनयभंग करणारा तरुण हा एमपीएससी करणारा विद्यार्थी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तू खूप सुंदर दिसते म्हणत पोर्टर डिलिव्हरी बॉयने शिवाजीनगर परिसरातील एका तरुणीचा विनयभंग केला होता. त्यानंतर तरुणीने डिलिव्हरी बॉय विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, पोलिसांनी रात्रीच या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज गाडीचा नंबर आणि पोर्टर ॲप मध्ये दिलेले डिटेल्स हे सगळं तपासून 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीधर कांबळे असं या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. श्रीधर हा मूळचा कराडचा राहणारा आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यात शुक्रवार पेठेत राहून एमपीएससीचा अभ्यास करत होता. रिकाम्या वेळात पोर्टरच काम करायचा.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोर्टर ॲपवरून सामान बोलवले होते. हे सामान घेण्यासाठी तरुणीने दरवाजा उघडला आणि पार्सल घेतलं. मात्र त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली. तरुणीने डिलिव्हरी बॉयला पाणी दिले. यावेळी डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या हाताला स्पर्श केला आणि तिला खूप सुंदर दिसतेस, असं म्हटलं होतं.
6 मार्चला संध्याकाळी पावने पाच वाजता तरुणीच्या घरी ही घटना घडली. यावेळी तरुणीच बाळ आणि सासू घरात होते. घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला आणि थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं. ॲपमधील सगळे डिटेल्स पोलिसांना दिले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीधर कांबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.