उदगीर : उदगीर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील नरसींगवाडी पाटीजवळ शनिवारी (ता.७) सायंकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटारसायकलची भीषण धडक होऊन दोन ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार, करडखेल परिसरात ऊसतोडीचे काम आटोपून मोटारसायकल (क्र. MH-24 AE 8998) वरून लोहारा गावाकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. MH-24 BL 0867) जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार गौतम ज्ञानोबा कांबळे (वय २५) व सुनील नागू कांबळे (वय १९), दोघेही रा. लोहारा (ता. उदगीर) यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
Accident News: नवी मुंबईत अपघाताचे सत्र, तिघांचा मृत्यूअपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे नामदेव चेवले तसेच लातूर एलसीबीचे तुळशीदास बरुरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. कारमधील जखमींना त्वरित ॲम्बुलन्सद्वारे उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला व वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या भीषण अपघातात दोन तरुण ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याने करडखेल व लोहारा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.