इराणमधील शाळा आणि त्याजवळच्या लष्करी तळावर झाले अनेक हल्ले? सॅटेलाईट इमेजमध्ये काय दिसलं?
BBC Marathi March 08, 2026 03:45 AM
Anadolu via Getty Images पडताळणी केलेल्या व्हीडिओमध्ये मिनाबमधील इराणी शाळेचं झालेलं नुकसान आणि धूर दिसतो.

(इशारा: या लेखातील काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते)

उपग्रहांद्वारे घेण्यात आलेल्या फोटोंच्या विश्लेषणातून इराणच्या दक्षिण भागातील शाळेभोवती अनेक हल्ले झाल्याच्या आणि जळल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत.

यातून दिसून येतं की तिथे एकापेक्षा अधिकवेळा हल्ला झाला होता. या हल्ल्यात शनिवारी (28 फेब्रुवारी) 168 लोक मारले गेल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

व्हेरिफाय किंवा पडताळणी करण्यात आलेले व्हीडिओ आणि उपग्रहांच्या फोटोंमधून दिसून येतं की मिनाबमधील शाजारेह तयेबेह प्राथमिक शाळा आणि त्याला लागून असलेल्या इरानियन रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) कम्पाउंडभोवती मोठं नुकसान झालं आहे.

यातून असंही दिसून येतं की या भागात 'एकाचवेळी किंवा जवळपास एकाचवेळी अनेक हल्ले झाले', असं दारूगोळा (म्युनिशन्स) तज्ज्ञ एन आर जेन्झेन जोन्स म्हणाले.

BBC

फोटोमध्ये उदध्वस्त झालेल्या दोन इमारती स्पष्टपणे दिसत आहेत. यातील एक आयआरजीसीच्या तळाच्या आत पूर्णपणे नष्ट झालेली इमारत आहे आणि एक शाळेची इमारत काही प्रमाणात कोसळलेली आहे.

हल्ला झाल्यानंतर लगेचच घेण्यात आलेल्या आणि खातरजमा करण्यात आलेल्या फोटोंमध्ये घबराटीची दृश्यं दिसत आहेत.

यात लोक ढिगाऱ्याखाली बळी पडलेल्यांचा शोध घेत असताना, कुटुंब ओरडत आहेत. काही व्हीडिओंमध्ये लोकं कॅमेऱ्यासमोर मुलांच्या शाळेच्या बॅगा आणि पुस्तकं धरून असलेली दिसत आहेत.

तीन दिवसांनंतरच्या, हवाई फुटेजमध्ये किमान 100 खुणा केलेल्या किंवा नुकत्याच खोदलेल्या कबरींच्या रांगा दिसून आल्या.

इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार ठरवलं. मात्र यापैकी कोणत्याही देशानं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

इस्रायलचं म्हणणं आहे की या भागातील कोणत्याही कारवाईबद्दल त्यांना माहिती नव्हती. तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले की अमेरिका या घटनेची अजूनही चौकशी करतं आहे आणि ते "कधीही नागरी लक्ष्यांवर हल्ला करणार नाहीत."

इराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउट असल्यामुळे म्हणजे इंटरनेट बंद असल्यामुळे या घटनेच्या तपशीलांची स्वतंत्रपणे पडताळणी करणं कठीण झालं आहे.

घटनेबद्दल काय समोर आलं?

हा हल्ला कोणाला लक्ष्य करून करण्यात आला होता, याबद्दल मोठ्या प्रमाणात अंदाज बांधले जात आहेत.

इराणच्या अधिकाऱ्यांनुसार, हा हल्ला स्थानिक वेळेनुसार साधारण 10:45 (07:15 जीएमटी) वाजता झाला.

बीबीसी व्हेरिफायनं शनिवारी (28 फेब्रुवारी) सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फुटेजची पुष्टी केली आहे. यामध्ये हल्ल्यानंतर लगेचच झालेले परिणाम दिसून येतात. हा इराणमधील आठवड्यानुसार कामकाजाचा पहिला दिवस होता.

एका व्हीडिओमध्ये एक माणूस शाळेच्या अंगणात धावत जात असताना चित्रीकरण करतो आहे.

आयआरजीसीच्या तळाच्या ईशान्येला ही शाळा आहे. यात शाळेच्या प्रवेशद्वारावरील एका चिन्हाचा काही भाग दिसतो. तो पर्शियन भाषेतील प्राथमिक शाळा या शब्दाच्या पहिल्या तीन अक्षरांशी जुळतो.

शाळेच्या अंगणात आतल्या बाजूला काळ्या धुरांचे चार लोट दिसतात. शाळेच्या मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खिडक्यांमधून धुराचे दोन लहान लोट बाहेर पडत आहेत.

शाळेचं अंगण आणि आयआरजीसीचा तळ यांना, मुलांच्या भित्तीचित्रांनी आणि पर्शियन वर्णमालेतील अक्षरांनी सजवलेल्या भिंती, एकमेकांपासून वेगळं करतात.

आयआरजीसीच्या कम्पाउंडच्या काठावर दक्षिणेकडील बाजूस चालत्या वाहनातून काढलेल्या आणखी एका व्हीडिओमध्ये प्रवेशद्वाराची खुण दाखवणारा एक फलक दिसतो.

तिथे 'सेयेद अल-शोहादा एज्युकेशनल अँड कल्चरल कॉर्प्स' आणि वैद्यकीय क्लिनिकच्या प्रवेशद्वारांवर आयआरजीसीचे दोन लोगो दिसतात. हे आयआरजीसीच्या नौदलाची असल्याचं वृत्त इराणमधील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

फुटेजमध्ये काळ्या धुराचे किमान 3 लोट दिसत आहेत. यातील 2 तळाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ आहेत आणि तिसरा तिथून पुढे वैद्यकीय क्लिनिकच्या मागील बाजूस दिसतो आहे.

पडताळणी करण्यात आलेल्या व्हीडिओंमधील धुरांच्या लोटांचं लोकेशन, उपग्रहांद्वारे घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये दिसत असलेल्या नुकसानीशी जुळतं.

त्याच दिवशी नंतर चित्रित करण्यात आलेल्या फुटेजमध्ये शाळेच्या इमारतीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं.

आपत्कालीन सेवा इमारतीच्या ढिगाऱ्यातून शोध घेत होती. तर दु:खी, हवालदिल झालेली कुटुंबं शाळेच्या अंगणात हळूहळू चालत होती. काहीजण टाहो फोडत होती.

शाळेच्या स्थानाची ओळख पटवलेला एक व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये घटनास्थळी असलेल्या बचाव पथकांना ढिगाऱ्याखाली एका मुलाचा तुटलेला हात सापडल्याचं दिसत होतं.

त्या ढिगाऱ्यातील शाळेची पाठ्यपुस्तकं आणि रक्तानं माखलेल्या शाळेच्या बॅगा यादेखील चित्रीत करण्यात आल्या होत्या.

उपग्रहांद्वारे घेण्यात आलेल्या फोटोंतून काय दिसतं?

जमिनीवरील अधिक फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शींची साक्ष उपलब्ध झालेली नसताना उपग्रहाद्वारे घेतलेले फोटो हे तिथे काय घडलं हे आपल्याला समजून घेण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहेत.

प्लॅनेट लॅब्सनं 4 मार्चला उपग्रहीय फोटो घेतले होते. ही घटना घडल्याच्या 4 दिवसांनी ते घेण्यात आले होते. आधी पडताळणी केलेल्या व्हीडिओंमध्ये पुष्टी करण्यात आल्यापेक्षा अधिक प्रमाणात विध्वंस झाल्याचं या फोटोंमधून दिसून येतं.

या भागातील अनेक इमारती अंशत: किंवा पूर्णपणे उदध्वस्त झाल्या आहेत. बीबीसी व्हेरिफायनं खड्डे दिसणाऱ्या आणि भाजून निघाल्याच्या किंवा होरपळल्याच्या काळ्या खुणा दिसणाऱ्या किमान 5 इमारतींची ओळख पटवली. त्यातून दिसून येतं की तिथे अनेक हल्ले झाले होते.

BBC

"इतकी ठिकाणं (आघात झालेली), इतक्या जवळ होती (तुलनात्मकरित्या सांगायचं तर), यातून असं दिसून येतं की एक किंवा त्यापेक्षा अधिक लक्ष्य एकमेकांच्या अगदी जवळ होती," असं ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीतील उपग्रहीय फोटोंचे विश्लेषक जेमॉन वॅन डेन होएक म्हणाले.

"असं दिसतं की या भागात हेतूपुरस्सर हल्ला करण्यात आला. मात्र हा हल्ला करण्यामागचा त्यांचा हेतू काय होता हे आपल्याला माहित नाही," असं ते पुढे म्हणाले.

मॅकेन्झी इंटेलिजन्स सर्व्हिसेसमधील एक वरिष्ठ विश्लेषक बीबीसी म्हणाले की शाळेच्या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील खड्ड्यातून दिसून येतं की 'खालची पातळी भेदण्यासाठी' विशेष दारूगोळ्याचा वापर करण्यात आला असावा.

शाळेचा परिसर वेगळा आहे का?

शाळेची इमारत आयआरजीसीच्या तळाच्या जवळ आहे.

या भागाच्या 2013 मध्ये उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या फोटोंमधून दिसून येतं की शाळेची इमारत याच कम्पाउंडचा भाग होती.

नंतर 2016 मध्ये एक भिंत दिसून आली जी शाळेच्या इमारतीला त्यापासून वेगळं करत होती.

या हल्ल्यासाठी जबाबदार कोण?

इराणचं म्हणणं आहे की अमेरिका आणि इस्रायलनं हा हल्ला केला. मात्र इस्रायल आणि अमेरिका या दोघांनीही शाळेला झालेल्या नुकसानीची जबाबदारी घेतलेली नाही.

इस्रायलनं म्हटलं आहे की, या भागातील आयडीएफच्या कोणत्याही कारवायांची त्यांना 'माहिती नाही'. मात्र त्यांनी बीबीसी व्हेरिफायला सांगितलं की ते घटनेची चौकशी करत आहेत.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी बुधवारी (4 मार्च) बीबीसीला सांगितलं की अमेरिका अद्याप या घटनेची चौकशी करत आहे.

ते पुढे म्हणाले, "आम्ही कधीही नागरी ठिकाणांना लक्ष्य करत नाही. मात्र आम्ही याबाबत चौकशी करत आहोत."

पत्रकार परिषदेदरम्यान तपशील स्पष्ट करण्यासाठी उदाहरण म्हणून एक नकाशा दाखवण्यात आला. यात अमेरिका-इस्रायलच्या इराणबरोबरच्या युद्धाच्या 'पहिल्या 100 तासांचा' नकाशा दाखवण्यात आला.

त्यामध्ये हल्ला करण्यात आलेली ठिकाणं आणि इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील इराणची हवाई संरक्षण ठिकाणं दाखवण्यात आली होती. यात मिनाबमधील भागाचाही समावेश होता.

BBC

दारूगोळ्याच्या अवशेषांचं अधिक फुटेज नसल्यास या हल्ल्यासाठी कोण जबाबदार आहे, हे स्पष्टपणे ओळखता येणं शक्य नाही.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमुळे असा दावा करण्यात येतो आहे की, आयआरजीसीला तिथून यशस्वीपणे क्षेपणास्त्र डागता आलं नाही आणि त्यातून हा स्फोट झाला.

मात्र, हा फोटो मिनाबपासून एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या झांजनमधील याच्याशी संबंधित नसलेल्या एका घटनेचा असल्याचं आम्हाला आढळून आलं.

"इथं दिसत असलेलं स्फोटामुळे झालेलं मोठं नुकसान, इराणच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रामुळे झालं असण्याची शक्यता कमी आहे.

या क्षेपणास्त्रांमध्ये तुलनेनं लहान स्फोटकं असतात," असं आर्मामेंट रिसर्च सर्व्हिसेसचे संचालक, जेन्झेन जोन्स म्हणाले.

यात कोण मारलं गेलं?

इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की या घटनेत मारले गेलेल्या 168 जणांपैकी बहुतांश जण मुलं होती.

या घटनेचं जे फुटेज उपलब्ध होतं, त्याद्वारे बीबीसी व्हेरिफायला या तपशीलांची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही. यात आयआरजीसीचे कोणी सदस्य मारले गेले आहेत की नाहीत किंवा तिथे कोणी कार्यरत होतं की नाही हेदेखील स्पष्ट नाही.

इराणच्या शिक्षण मंत्रालयानुसार, शाळेमध्ये एकूण 264 विद्यार्थी होते.

इराणमधील प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या एका हस्तलिखित यादीमध्ये या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 56 जणांची नावं आणि त्यासोबत त्यांच्या जन्मतारखा देण्यात आल्या आहेत. यात नावं असणाऱ्यांपैकी 48 जण 6 ते 11 वर्षे वयोगटातील आहेत.

बीबीसी व्हेरिफायला या तपशीलांची स्वतंत्रपणे पडताळणी करता आलेली नाही. मात्र या यादीतील किमान 3 नाव आणखी एका व्हीडिओमध्ये दिसतात. या व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या शवपेट्यांवर तीच नावं लिहिण्यात आलेली आहेत.

Reuters या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या अंत्ययात्रेत 3 मार्चला सहभागी झालेले लोक

फोटोंमध्ये देखील या शवपेट्यांमध्ये 3 मुलं असल्याचं दिसून येतं.

अमेरिकेतील मानवाधिकार वृत्तसंस्थेनं (एचआरएएनए) या युद्धाची सुरुवात झाल्यापासून 1,114 इराणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. त्यात 183 मुलांचा समावेश आहे.

काही दिवसांनी, अंत्ययात्रेसाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो लोकांच्या फुटेजचं प्रसारण इराणच्या सरकारी माध्यमांनी केलं. त्यात पुरुष शवपेट्या - त्यातील काही लहान मुलांच्या आकाराच्या होत्या - घेऊन जात असल्याचं दिसून येत आहे.

त्या शवपेट्यांवर इस्लामिक रिपब्लिकचा ध्वज लपटलेला होता. तर महिलांच्या गर्दीनं मुला-मुलींचे फोटो हातात धरलेले होते.

आयआरजीसीशी संलग्न असलेल्या तसनिम या निम-सरकारी वृत्तसंस्थेनं, एक फोटो प्रकाशित केला. त्यांनी म्हटलं आहे की या हल्ल्यात 14 शालेय शिक्षक मारले गेले आहेत.

पॉल ब्राऊन यांचं अतिरिक्त वार्तांकन.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • अमेरिकेने बुडवलेल्या इराणच्या 'त्या' युद्धनौकेच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर होती का?
  • अमेरिका आणि इराण : कुणाची ताकद किती? युद्ध लांबल्यास कोणाला जास्त नुकसान होईल?
  • इराणच्या 'धोकादायक' हल्ल्यांमुळे आखाती देश युद्धात ओढले जाऊ शकतात का?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.