Lemon Price Hike: उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लिंबू महाग, एका लिंबाची 'इतकी' किंमत
esakal March 09, 2026 11:45 PM

नवी मुंबई : वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई शहरात लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट भावावर झाला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत स्वस्त मिळणारे लिंबू आता बाजारात महाग झाले असून किरकोळ बाजारात एका लिंबासाठी पाच ते सहा रुपये मोजावे लागत आहेत.

उन्हाचा पारा वाढत असताना नागरिकांकडून लिंबूपाणी, सरबत व इतर पेयांचे सेवन वाढले आहे. त्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली असून बाजारात त्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात दीड ते दोन रुपयांना मिळणारे लिंबू आता दोन ते तीन रुपये झाले आहे.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा पहारा; भरधाव वाहनचालकांवर होणार कारवाई

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ५) २६६ क्विंटल लिंबांची आवक झाली. महाराष्ट्रातील हंगाम संपत आल्याने सध्या लिंबाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडील राज्यांतून, विशेषतः तमिळनाडू व इतर राज्यांतून होत आहे. त्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

किरकोळ बाजारात आठवडाभरापूर्वी १० रुपयांत चार लिंबू मिळत होते; मात्र आता त्याच किमतीत दोन लिंबू मिळत असून काही ठिकाणी एका लिंबासाठी पाच रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्याचा कालावधी वाढत गेल्यास लिंबाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. उन्हामुळे लिंबूपाणी व थंड पेयांची मागणी वाढत असल्याने येत्या काही दिवसांत लिंबाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Mumbai News: सात हजार कोटी खर्च, तरी नद्यांचे पुनरुज्जीवन अपूर्णच; पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.