Pune News : पुणे महापालिकेच्या २० गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद
esakal March 09, 2026 11:45 PM

पुणे - इराण-इस्राईल युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. गॅस पुरवठ्यावर ताण निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने घरगुती वापरासाठी एलपीजीला प्राधान्य देण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पुणे महानगरपालिकेने शहरातील स्मशानभूमींमधील २० गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने पाच मार्चला आदेश काढून प्रोपेन व ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद राहणार असून नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत देण्यात आली आहे.

यानंतर आता पुढील आदेश येईपर्यंत पुणे शहरातील महानगरपालिकेच्या गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी तसेच एपीसी प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.

नागरिकांनी याची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. बिबवेवाडी स्मशानभूमीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत गॅस पुरवठा केला जाणाऱ्या दोन गॅस दाहिन्या सध्या कार्यरत ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

येथे उपलब्ध आहेत विद्युत दाहिन्या -

येरवडा स्मशानभूमी (गुंजन चौक, नगर रोड), खराडी स्मशानभूमी (खराडी गाव), कैलास स्मशानभूमी (एस.एस.पी.एम.एस. मैदानाजवळ, संगमवाडी), कोथरूड स्मशानभूमी (गुरुगणेश नगर), वाघोली स्मशानभूमी (औंध - बाणेर लिंक रोड) तसेच गंगानगर स्मशानभूमी (हडपसर) येथे विद्युत दाहिन्या उपलब्ध आहेत. नागरिकांनी या सुविधांचा उपयोग करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.