CA Exam : मांदारणे येथील विराजची सीए पदावर मोहर; अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन
esakal March 10, 2026 03:45 AM

ओतूर - मांदारणे (ता. जुन्नर) येथील शैलेश निवृत्ती हांडे व संगीता हांडे यांचा मुलगा विराज हांडे याने द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने (आयसीएआय) जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए)च्या अंतिम परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे.

विराजचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे विद्या भवन घाटकोपर येथे झाले. २०१६ दहावी (इंग्रजी माध्यम) परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण हिंदुजा महाविद्यालय मुंबई या ठिकाणी घेतले. त्यावेळीच सीएचे क्लास सुरू केले.

सन २०२१ मध्ये सोमय्या महाविद्यालय विद्याविहार येथून बीकॉम पूर्ण केले. शहा आणि चतुर्वेदी सीए फर्ममध्ये तीन वर्षे आर्टिकल शिप पूर्ण करून जानेवारी २०२६ मध्ये सीएच्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते हे दाखवून दिले.

वडील शैलेश हांडे हे मुंबईमध्ये व्यावसायिक तर आई संगीता या गृहिणी असून अमर सेवा सहकारी पतसंस्थेची संचालिका म्हणून काम करत आहेत. मुलगा विराज याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खूप मेहनत करून सनदी लेखापाल ही पदवी प्राप्त केल्याबद्दल मुलाचे खूप कौतुक करत समाधान व्यक्त करत आहेत.

विराजच्या या यशाबद्दल त्याच्यावर मुंबईसह मांदारणे पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून मी जिद्द आणि चिकाटीने रात्रंदिवस प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच आज मला हे यश मिळाले आहे.

- विराज हांडे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.