शिक्रापूर - शिक्रापूर (ता. शिरूर येथील मयूर शिवाजी राऊत या शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादित करून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
मयूरचे वडिल शिवाजी राऊत हे शेतकरी आहेत. मयूरने पहिली ते पाचवी जिल्हा परिषद शाळेत नंतर सातवी ते दहावीचे शिक्षण विद्याधाम प्रशालेत घेऊन आपल्या आई वडिलांच्या शेतीतील कष्टाची जाणीव ठेवत पुढील उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर व पुणे येथे पूर्ण केले.
पुढे बी.ए.एलएल.बी. ही कायद्याची पदवी प्राप्त करून त्याने थेट स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवीत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, ग्रामस्थ व नागरिकांनी मयूरचा नुकताच सन्मान केला.
माझ्या आई-वडिलांसह चुलते सुभाष राऊत यांचा खंबीर पाठिंबा, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि स्वतःचा संयम... हेच माझ्या यशाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. ग्रामिण भागातील प्रत्येक युवकासाठी माझ्याएवढीच संधी उपलब्ध आहे. उतरा, कष्ट करा, यश फार दूर नाही.
- मयूर राऊत, पोलिस उपनिरीक्षक, शिक्रापूर