तळोजा एमआयडीसीतील उग्र वासाने नागरिक त्रस्त
esakal March 10, 2026 07:46 PM

खारघर, ता. १० (बातमीदार) : तळोजा एमआयडीसी परिसरातून गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी हवेत सोडल्या जाणाऱ्या रसायनांच्या उग्र वासामुळे खारघर, तळोजा, तसेच नावडे, रोडपाली परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या वायुप्रदूषणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

तळोजा प्रदूषण महामंडळ तळोजा विभागाचे क्षेत्रीय अधिकारी विक्रांत भालेराव यांच्याशी यासंदर्भात संपर्क केला असता होऊ शकला नाही. तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. पहाटेच्या वेळी बाहेर पडल्यावर परिसरात पसरणाऱ्या उग्र वासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली आदी परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. परिसरात पसरणाऱ्या उग्र वासामुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास, दमा यासारख्या समस्या वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

खारघर, तळोजा आणि रोडपली येथील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. पहाटेच्या वेळी परिसरात रसायनांचा उग्र वास पसरत असल्यामुळे झोपमोड होत आहे. मंडळाने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर करावी करावी, अशी मागणी रहिवासीयांकडून केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.